नवी दिल्ली : गेल्या काही काळात देशात डिजिटायझेशनचा वेग खूप वाढला आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्र ऑनलाइन माध्यमातून जोडले जात आहे. सरकार डिजिटलायझेशनवरही खूप भर देत आहे. आजकाल लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI पेमेंट इत्यादी माध्यमांचा वापर करू लागले आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या डिजिटलायझेशनसोबतच फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढल्या आहेत.
सध्या सायबर गुन्हेगार लोकांना विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सबसिडी देऊन त्यांच्या खात्यातून लाखो रुपये काढून घेत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, हे गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आणि त्यांची खाती रिकामी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे आणि प्रश्नमंजुषा (क्विज) वापरतात, असे पोस्ट ऑफिसने सांगितले आहे.
आजकाल इंटरनेटवर अनेक प्रकारच्या बनावट वेबसाइट्स आणि URL आहेत, ज्यावर काळजीपूर्वक विचार करून क्लिक केले पाहिजे. या वेबसाइट्सवर वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे काम केले जाते. गेल्या काही दिवसांत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, ईमेल आणि एसएमएस यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे सर्वेक्षण आणि प्रश्नमंजुषा केली जात आहे. यानंतर ते सरकारी अनुदान देण्याचे आश्वासन देतात आणि काही लिंकवर क्लिक करण्यास सांगतात, असे पोस्ट ऑफिसने म्हटले आहे.
.@IndiaPostOffice warns public against fraudulent URLs/Websites claiming to provide subsidies/prizes through certain surveys, quizzes
— PIB_INDIA Ministry of Communications (@pib_comm) April 23, 2022
Details: https://t.co/TrGq8FE63bpic.twitter.com/v9U7CmZPeP
वैयक्तिक माहिती शेअर करण्याची चूक करू नका
पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे की, सरकारने असे कोणतेही सर्वेक्षण सुरू केले नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टच्या फंदात पडणे टाळावे. तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक डिटेल्स, पॅनकार्ड, आधार कार्ड डिटेल्स चुकून सुद्धा कोणाशीही शेअर करू नका. तसेच, तुमचा नेट बँकिंग पासवर्ड, कार्डचा CVV नंबर आणि पिन शेअर करू नका. अशा मेसेजपासून सावध राहा आणि इतरांनाही त्याबद्दल माहिती द्या.