Join us

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक; ED ने 30 बँक खात्यांमधील 170 कोटी रुपये गोठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:51 IST

घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांच्या आवळल्या मुसक्या.

ED Action : बनावट फॉरेक्स ट्रेडिंग आणि डिपॉझिट स्कीम चालवणाऱ्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी(13 फेब्रुवारी) 170 कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या. ईडीच्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली, नोएडा, उत्तर प्रदेशातील शामली आणि हरियाणातील रोहतक येथे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. हा तपास QFX ट्रेड लिमिटेड आणि तिचे संचालक राजेंद्र सूद, विनीत कुमार आणि संतोष कुमार यांच्या विरोधात केला जात आहे. याशिवाय या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नवाब अली उर्फ ​​लविश चौधरीच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा हा तपास सुरू करण्यात आला. QFX कंपनीवर बनावट फॉरेक्स ट्रेडिंग स्कीमद्वारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ED ने सांगितले की, QFX कंपनी आणि तिचे संचालक कोणत्याही नियमाशिवाय ठेव योजना चालवत होते आणि गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवत होते.

MLM योजनेंतर्गत फसवणूकईडीच्या माहितीनुसार, QFX ग्रुपचे एजंट मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजनेअंतर्गत गुंतवणूक योजना चालवत होते. यासाठी वेबसाइट, मोबाईल ॲप आणि सोशल मीडियाच्या जाहिरातींचा वापर करण्यात आला. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच, अधिकाधिक गुंतवणूकदारांना या फसवणुकीत अडकवता यावे यासाठी भारत आणि दुबईमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे.

QFX ते YFX (Yorker FX)...

पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीला कळले की, क्यूएफएक्स योजनेचे नाव बदलून वायएफएक्स (यॉर्कर एफएक्स) करण्यात आले आणि गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचा खेळ त्याच पद्धतीने सुरू ठेवण्यात आला. ईडीला असेही आढळून आले की, नवाब अली उर्फ ​​लविश चौधरी बोटब्रो, टीएलसी कॉईन, यॉर्कर एफएक्स यासारख्या अनेक बनावट गुंतवणूक योजना चालवत होता आणि त्यांना फॉरेक्स ट्रेडिंग ॲप्स/वेबसाइट्स म्हणून प्रमोट करत होता.

शेल कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार एनपे बॉक्स प्रायव्हेट लिमिटेड, कॅप्टर मनी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टायगर डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या अनेक कंपन्यांचा वापर गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यासाठी करण्यात आल्याचे ईडीने उघड केले. या सर्व कंपन्या शेल (डमी) कंपन्या होत्या, ज्यांचा वापर QFX/YFX घोटाळ्यातील सूत्रधारांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यासाठी केला होता.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयसायबर क्राइमधोकेबाजी