Zeroda frauds News : ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग अॅप्लिकेशन झिरोदाने सोशल मीडियावर कंपनीच्या नावाने सुरू असलेल्या एका घोटाळ्याबद्दल सावध केले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा घोटाळा सुरू आहे.
झिरोदाच्या नावे काय सुरू आहे घोटाळा?
स्टॉक ट्रेडिंग झिरोदाने यासंदर्भात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्रामवर फेक ग्रुप चालवले जात आहेत. त्यावर लोकांना वेगवेगळे आर्थिक सल्ले दिले जाताहेत, जे फसवे आहेत. त्याचबरोबर बोगस वेबिनार आणि स्टॉक टिप्सचा धंदा सुरू आहे. झिरोदाने वेगवेगळ्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या बोगस ग्रुपच्या लिंकही त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केल्या आहेत.
फ्रॉड ग्रुपबद्दल झिरोदाने काय म्हटले आहे?
"बोगस व्हॉट्सअॅप, टेलिग्राम ग्रुपपासून सावध रहा. अलिकडेच आम्हाला अनेक व्हॉट्सअॅप, टेलिग्राम ग्रुपबद्दल कळले आहे. हे ग्रुप झिरोदा आणि नितीन कामथ यांच्या नावाने चालवले जात आहेत", असे झिरोदाने म्हटले आहे.
कंपनीने पोस्टमध्ये व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवर जे ग्रुप झिरोदाच्या नावाने सुरू आहेत, त्याचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत, ज्यात झिरोदा नाव आणि लोगोचा वापर केल्याचे दिसत आहे.
तुमची आर्थिक फसवणूक कशी होऊ शकते?
झिरोदाने याबद्दल म्हटले आहे की, "तुम्ही एकदा या ग्रुपमध्ये सामील झाला की, तुम्हाला मोफत वेबिनार आणि स्टॉक्स टिप्स देण्याबद्दल ऑफर दिल्या जातील. काही काळ गेल्यानंतर तुम्हाला हे ग्रुप खरे असल्याचे वाटेल. त्यानंतर तुमच्याकडून ते पेड सर्व्हिसेसच्या (पैसे घेऊन पुरवल्या जाणाऱ्या सेवा) नावावर पैसे पाठवण्यास सांगतील."
"लक्षात ठेवा, जर कोणी तुम्हाला विशिष्ट रिटर्न देण्याची हमी देत असेल, तर १०० टक्के तो स्कॅम आहे. त्याचबरोबर तुमच्या अकाऊंटशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती दुसऱ्या कुणासोबतही शेअर करू नका", असे इशारा झिरोदाने दिला आहे.
झिरोदाने लोकांना आवाहन केले आहे की, "जर व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम वा इन्स्टाग्रामवर झिरोदाच्या नावावर जर कोणताही बोगस अकाऊंट किंवा ग्रुप दिसला, तर त्याबद्दल तक्रार करून आम्हाला मदत करा."