नवी दिल्ली : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून ठेवण्यात आली होती. मात्र, आता ती १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता तुम्ही तुमचे आधार कार्ड १४ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय अपडेट करू शकणार आहात.
आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI च्या वेबसाइटनुसार, आता ग्राहक १४ सप्टेंबरपर्यंत आपल्या आधार कार्डमधील नाव आणि पत्ता मोफत अपडेट करू शकतील. दरम्यान, UIDAI ने सांगितले होते की, जर तुमचे आधार कार्ड १० वर्षे जुने असेल तर तुम्ही ते अपडेट करावे. माय आधार पोर्टलवर आधार कार्ड अपडेटिंग मोफत होत आहे.
आधार हा १२ अंकी युनिक ओळख क्रमांक आहे, जो भारतीय नागरिकांना बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित दिला जातो. तुम्ही आधार ऑफलाइन सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल.
काय अपडेट्स करता येतील?ही मोफत सेवा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर कोणतेही कागदपत्र अपलोड केले तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. जरी तुम्ही कागदपत्रे प्रत्यक्ष सादर केली, तरी तुम्हाला ही फी भरावी लागेल. आधार कार्डमध्ये तुम्ही तुमचा फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता इत्यादी सहज बदलू शकता. तसेच, तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल देखील बदलू शकता.
अशाप्रकारे करा तुमचे आधार कार्ड अपडेट...१. सर्वप्रथम तुम्हाला आधार वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जावे लागेल.२. आता OTP द्वारे लॉग इन करा.३. यानंतर तुमची प्रोफाइल दिसेल. आता तुम्हाला बदलायची असलेली माहिती अपडेट करा.४. आता पुरावा अॅटॅच करा आणि सबमिट करा. डॉक्युमेंटचा आकार २ MB पेक्षा कमी नसावा. फाइल फॉर्मेट JPEG, PNG किंवा PDF असावे.
- दरम्यान, कोणतेही शुल्क नसल्याने तुम्हाला कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. तुम्ही फक्त तीच माहिती ऑनलाइन अपडेट करू शकता, ज्यासाठी डेमोग्राफिक अपडेटची आवश्यकता नाही.