लाखो भारतीयांना सोयीसाठी युआयडीएआयनं (UIDAI) काही महिन्यांसाठी आधारमधील दस्तऐवजांची ऑनलाइन अपडेट सेवा मोफत केली आहे. म्हणजेच आधार युझर्सना कोणतेही दस्तऐवज किंवा माहिती ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या आधारमध्ये चुकीची माहिती असेल किंवा तुम्हाला जर माहिती अपडेट करायची असेल, तर हे काम घरबसल्या ऑनलाइन करता येईल.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI आधार युझर्सना मार्च २०२३ पासून त्यांची माहिती पुन्हा व्हेरिफाय करण्यास सांगत आहे. लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधिकरणानं काही महिन्यांसाठी ऑनलाइन दुरुस्ती शुल्क माफ केले आहे. युआयडीएआयनं युझर्सना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करण्यास सांगितलं आहे. विशेषत: ज्या ग्राहकांचं आधार दहा वर्षांपूर्वी जारी झाल्यापासून ते कधीही अपडेट केलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.
कधीपर्यंत आहे डेडलाईन
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची विनामूल्य सेवा १५ मार्च २०२३ पासून सुरू आहे. ही सेवा जून २०२३ च्या शेवटच्या महिन्यात १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, कोणताही आधार युझर १४ सप्टेंबरपर्यंत त्याचे तपशील विनामूल्य अपडेट करू शकतो.
सेंटरवर ५० रुपये शुल्क
आधार युझर्सना मोफत दस्तऐवज किंवा तपशील अपडेट करण्याची सुविधा फक्त myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in वर दिली जात आहे. जर सेंटरवर जाऊन ही माहिती अपडेट केली तर त्यासाठी पूर्वीप्रमाणेच ५० रुपयांचं शुल्क आकारलं जाईल.