नवी दिल्ली : गरिबांच्या हितासाठी सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच गरीबांना मोफत किंवा कमी दरात रेशन (Free Ration) देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमध्ये अन्न सुरक्षा, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत धान्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 4.4 कोटी टन इतके अन्नधान्य आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
1 एप्रिल 2023 पर्यंत सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर सुमारे 1.30 कोटी टन गहू आणि 2.36 कोटी टन तांदूळ उपलब्ध होईल, असे खाद्य मंत्रालयाने सांगितले. त्याचवेळी, मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) तीन महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी 44,762 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अन्नधान्याचा पुरेसा साठा
"राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), इतर योजना आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनाच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी एफसीआयकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एफसीआयजवळ गोदामात जवळपास 2.32 कोटी टन गहू आणि 2.09 कोटी टन तांदूळ आहे.
किती खर्च केला?
अलीकडेच, सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर अशी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. दुसरीकडे, या योजनेच्या शेवटच्या सात टप्प्यांमध्ये, एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 3.91 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि 1,121 लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले.