Free snacks, nap rooms, work-life balance : (Marathi News) नवी दिल्ली : कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करतात. दरम्यान, ज्यावेळी चांगले वर्क-लाइफ बॅलन्स असते, त्यावेळी कर्मचारी चांगले काम करतात आणि कंपन्यांना त्याचा अधिक फायदा होतो, असे बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मायक्रोसॉफ्ट देखील त्यापैकी एक आहे. कारण, इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये यासंबंधीचा दावा केला जात आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे आणि लोकांना त्यांच्या कामाच्या वातावरणाबद्दल सांगितले आहे. व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी आपल्या ऑफिसची झलक दाखवत आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या कंपनीत काम करण्याचे काय फायदे आहेत, ते सांगत आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मायक्रोसॉफ्टच्या हँडलवरूनही कमेंट करण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या हैदराबाद कार्यालयाची झलक दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऑफिस कॅम्पसचे सौंदर्य दिसत आहे. ऑफिस कॅम्पस शांत वातावरणात वसलेला आहे आणि भरपूर हिरवळ आहे. मायक्रोसॉफ्टकडून त्यांना मोफत नाश्ता, फिल्टर कॉफी, मायक्रोसॉफ्टचे बरेच टी-शर्ट इत्यादी मिळत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
सोशल मीडियावर युजर्सना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी कार्यालयातच तयार केलेले सुंदर नॅप रूम्स आहे, जिथे कर्मचारी आराम करू शकतात आणि त्यांचा थकवा दूर करु शकतात. कंपनीकडून संपूर्ण शहरासाठी वातानुकूलित शटल बस सेवा मिळत असल्याचे मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी सांगत आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याची सोय मिळते. एकूणच, मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना वर्क-लाइफ बॅलन्स ठेवण्यासाठी कंपनीकडून मदत केली जाते.
सर्वात मोठी लिस्टेड कंपनीमायक्रोसॉफ्ट अलीकडेच ॲपलला मागे टाकून जगातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी बनली आहे. सध्या, मायक्रोसॉफ्ट ही जगातील एकमेव कंपनी आहे, ज्याचे मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतातील हैदराबादमधील मायक्रोसॉफ्टचे कार्यालय 54 एकर परिसरात बांधले आहे. मायक्रोसॉफ्टच्या हैदराबाद कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट, 24 तास रुग्णवाहिका, फार्मसी, प्रत्येक मजल्यावर मिटिंग रूम, आउटडोर ॲम्फीथिएटर, जिम यासारख्या सुविधा देण्याचा दावा केला जातो.