नवी दिल्ली : भारत आणि युरोपीय संघ यांच्यादरम्यान नजीकच्या भविष्यात मुक्त व्यापार करार (एफटीए) होण्याची शक्यता फार कमी आहे, असे ‘असोचॅम’ने म्हटले आहे. २८ देशांचा समूह आणि त्यांच्या विशाल अंतर्गत मुद्यांचे जटील स्वरूप या संदर्भात ‘असोचॅम’ने हे भाष्य केले आहे.व्यापक द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक कराराच्या (बीटीआयए) संदर्भात युरोपीय संघासोबत सुरू असलेली बोलणी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे भारताने आता ब्रिटनसोबत स्वतंत्र मुक्त व्यापार समझोत्यासाठी भर द्यायला पाहिजे. ब्रिटनसोबतच्या समझोत्यावर चर्चा करणे आणि समझोत्याला अंतिम रूप देणे अधिक सुलभ होईल. कारण ब्रिटनला देखील आपल्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारासाठी भारतीय बाजारपेठेची गरज आहे, असे असोचॅमने एका निवेदनात म्हटले आहे. युरोपीय संघाच्या संरचनेचे जटील स्वरूप आणि त्याचे विशाल अंतर्गत मुद्दे पाहता निकट भविष्यात या २८ देशांच्या समूहाशी सौदे होण्याची शक्यता धूसर आहे. ब्रिटनसोबत एफटीएबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या ब्रिटन दौऱ्यातच भर देण्यात आला पाहिजे, असे या संघटनेने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
भारत आणि युरोपीय संघात मुक्त व्यापार करार अशक्य-असोचॅम
By admin | Published: November 12, 2015 11:44 PM