>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - योगा गुरूंसाठी एक खुशखबर असून योगाशी संबंधित अभ्यासक्रम चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत असतील तर त्यांना सेवा कर भरावा लागणार नाही असे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्सने अधिसूचनेच्या माध्यमातून जाहीर केले आहे. यामुळे या संस्थांना तब्बल १४ टक्के असलेल्या सेवाकरातून मुक्ती मिळाली आहे.
योगाचा प्रसार करणा-या संस्थाना करसवलत देण्याची घोषणा २०१५च्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्याला अनुसरून सेंट्रल बोर्डाने २१ ऑक्टोबर रोजी सदर नोटिफिकेशन काढले आहे.
योगा हे धर्मादाय कृत्य असल्याचे गृहीत धरण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे कारण धर्मादाय संस्थांमध्ये धार्मिक व आत्मिक उन्नतीच्या प्रगतीसाठी कार्य केले जाते. या बदलामुळे योगासंदर्भात सुस्पष्टता आल्याचे करतज्ज्ञांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजली ट्रस्टने गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा सेवा कर भरला होता हे लक्षात घेता अशा संस्थांना आता फायदा मिळणार आहे. अर्थात, हेल्थ व फिटनेस इन्स्टिट्युट ज्या धर्मादाय संस्था म्हणून नोंद नाहीत त्यांना योगा शिकवण्यावर करसवलत मिळणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.