नवी दिल्ली : देशात नवपदवीधरांची नोकर भरती तेजीत असून जुलै ते डिसेंबर या कालावधीत १७ टक्के कंपन्यांनी आपल्या भरतीत नवपदवीधरांना (फ्रेशर्स) प्राधान्य दिले असल्याची माहिती ‘टीमलीज एडटेक’ने जारी केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.
‘करिअर आऊटलूक रिपोर्ट’ नावाच्या या अहवालात म्हटले आहे की, जुलै ते डिसेंबर या कालावधीत जागतिक पातळीवर नवपदवीधरांना केवळ ६ टक्के कंपन्यांनी प्राधान्य दिले. त्या तुलनेत भारतातील चित्र नवपदवीधरांसाठी दिलासादायक राहिले. १८ क्षेत्रे आणि १४ शहरांत हे सर्वेक्षण करण्यात आले. फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीच्या तुलनेत भरतीमध्ये २ टक्के वाढ झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
कोविड साथीच्या काळात नवपदवीधरांची सर्वाधिक भरती करणाऱ्या क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञान (३१ टक्के), दूरसंचार (२५ टक्के) आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्स (२५ टक्के) यांचा समावेश आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या इतर क्षेत्रांत आरोग्य व औषधी (२३ टक्के), रसद (२३ टक्के) आणि वस्तू उत्पादन (२१ टक्के)
यांचा समावेश आहे. अनेक कंपन्या अनुभवी व्यक्तींपेक्षा नव्यांना प्राधान्य देतात.
मुंबई दुसऱ्या तर पुणे पाचव्या स्थानावर
जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये झालेल्या विविध कंपन्यांमधील भरतीमध्ये बंगळुरू अव्वल राहिले. ४३ टक्के नवपदवीधरांची भरती करून बंगळुरू शहर देशामध्ये प्रथम स्थानी आहे. मुंबई (३१ टक्के) दुसऱ्या आणि दिल्ली (२७ टक्के) तिसऱ्या स्थानी राहिले. त्यानंतर चेन्नई (२३ टक्के) आणि पुणे (२१ टक्के) यांचा क्रमांक लागला.