Ratan Tata Family Tree : भारतीय उद्योग आणि परोपकाराच्या क्षेत्रातील दिग्गज रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि मोठा वारसा मागे ठेवला. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर देशासह जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र अनेकांना रतन टाटा यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाबातही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. रतन टाटा यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य त्यांचे जीवन अतिशय खाजगी पद्धतीने जगत आहेत. जाणून घेऊया त्याच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहेत.
टाटा कुटुंब हे भारतातील सर्वात प्रमुख आणि प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबांपैकी एक आहे. बुधवारी देशाच्या व्यापार जगताचे एक अनमोल युग संपले आहे. भारतीय उद्योग जगतातील दिग्गज आणि टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे आणि ते सध्या कुठे आहेत याबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यामुळे जाणून घेऊया या कुटुंबातील प्रमुख सदस्यांबद्दल...
नुसरवानजी टाटा (१८२२-१८८६)
हे टाटा कुटुंबाचे प्रमुख आहेत. नुसेरवानजी टाटा हे पारशी धर्मगुरू होते ज्यांनी व्यवसायात पाऊल टाकले आणि कुटुंबाच्या भविष्यातील उपक्रमांचा पाया रचला.
जमशेदजी टाटा (१८३९-१९०४)
नुसेरवानजी टाटा यांचे पुत्र आणि टाटा समूहाचे संस्थापक. "भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे शेदजी टाटा यांनी स्टील (टाटा स्टील), हॉटेल्स (ताजमहाल) मध्ये मोठे व्यवसाय स्थापन केले.
दोराबजी टाटा (१८५९-१९३२)
जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ पुत्र. जमशेटजींच्या निधनानंतर टाटा समूहाचा ताबा घेतला. टाटा स्टील आणि टाटा पॉवर यांसारखे इतर मोठे उपक्रम उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रतनजी टाटा (१८७१-१९१८)
रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते. त्यांनी टाटांच्या व्यावसायिक हितसंबंधांचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषत: कापूस आणि कापड उद्योगांमध्ये.
जेआरडी टाटा (जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा) (१९०४-१९९३)
रतनजी टाटा आणि सुझान ब्रियर यांचे पुत्र. टाटा समूहाचे ५० वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष. टाटा एअरलाइन्सचे संस्थापक, जी नंतर एअर इंडिया बनली. टाटा समूहाला वैविध्यपूर्ण बहुराष्ट्रीय समूह म्हणून विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नवल टाटा (१९०४-१९८९)
रतनजी टाटा यांचे दत्तक पुत्र आणि टाटा समूहातील महत्त्वाची व्यक्ती.
रतन नवल टाटा (१९३७)
नवल टाटा यांचे पुत्र आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा. त्यांनी टाटा समूहाच्या जागतिक विस्ताराचे आणि जग्वार लँड रोव्हर आणि टेटली यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या अधिग्रहणाचे नेतृत्व केले.
नोएल टाटा (१९५७)
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ. टाटा समूहाच्या रियल स्ट्रेटचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि टाटा इंटरनॅशनल आणि इतर टाटा उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोएल हे आयरिश नागरिकत्व असलेला भारतीय व्यापारी आहेत. नोएल यांचे लग्न आलू मिस्त्री यांच्याशी झाले आहे आणि त्यांना तीन मुलं आहेत, लिआ, माया आणि नेव्हिल.
जिमी टाटा
रतन टाटा यांचे धाकटे भाऊ. जिमी हे रतन टाटा यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत आणि त्यांनी ९० च्या दशकात निवृत्ती घेण्यापूर्वी टाटा कंपन्यांमध्ये काम केले होते. रतन टाटा यांच्याप्रमाणेच जिमी टाटा हे टाटा सन्स आणि टाटा कंपन्यांमध्ये भागधारक आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत. रतन टाटांप्रमाणे त्यांनीही लग्न केलेले नाही.
सिमोन नवल टाटा
सिमोन नवल टाटा या एक स्विस-जन्म भारतीय उद्योगपती आहेत, ज्या नवल टाटांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. सिमोन १९६१ मध्ये लॅक्मे लिमिटेडच्या बोर्डात सामील झाल्या आणि १९६४ मध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाल्या. त्यांने ट्रेंटची स्थापना केली आणि ३० ऑक्टोबर २००६ पर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले.
लिआ नोएल टाटा
नोएल टाटा यांची मोठी मुलगी. त्यांनी स्पेनमधील माद्रिद येथील बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये मास्टर्स केले आहे. २००६ मध्ये, लिआ यांनी त्याच्या कारकिर्दीला ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये असिस्टंट सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सुरुवात केली आणि ताज हॉटेल्समध्ये विकास आणि विस्तार प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही काम केले.
माया टाटा
नोएल टाटा यांची धाकटी मुलगी. माया टाटा अपॉर्च्युनिटीज फंडात काम करायच्या. टाटा अपॉर्च्युनिटीज फंड अचानक बंद झाल्यानंतर माया टाटा डिजिटलमध्ये सामील झाल्या.
नेव्हिल टाटा
नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांचा मुलगा आहे. तो त्यांच्या आजी सिमोन टाटा यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांचे वडील नोएल टाटा यांनी बांधलेल्या ट्रेंट या रिटेल चेनमध्ये काम करतो. किर्लोस्कर टेक्नॉलॉजीजच्या संचालिका मानसी किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना जमशेट टाटा नावाचा मुलगा आहे.