चिन्मय काळ
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा दर ७४ ते ७६ डॉलर प्रति बॅरल असताना सरकारी तेल कंपन्या ८८ ते ९२ डॉलर दरानुसार गणित मांडून इंधन ५ रुपये महागड्या दराने विक्री करीत आहेत. इंधनदर निश्चित करताना कंपन्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियोजन व विश्लेषण सेलकडेही दुर्लक्ष करीत असून, ही सरकारी कंपन्यांकडून होणारी अक्षम्य बनवाबनवीच आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलसाठी खनिज तेल ८८.६९ व डिझेलसाठी ९२.६२ डॉलर प्रति बॅरलने खरेदी करीत असल्याचे दर्शवले आहे. वास्तवात आंतरराष्टÑीय बाजारातील दर ७४ ते ७६ डॉलर आहे. भारत सर्वाधिक खनिज तेल सौदी अरेबिया व इराकमधून समुद्रीमार्गे टँकरने आयात करतो. या आयातीचा खर्च प्रति बॅरल ५ डॉलर असतो. भारतीय रुपयात व लीटरमध्ये त्याचा हिशेब केल्यास, तेल कंपन्या ४.२१ ते ५.२० रुपये प्रति लीटर अधिक दराने पेट्रोल-डिझेल ग्राहकांच्या माथी मारत आहेत.
हा तर २०१३ चा दर
तेल कंपन्यांनी दर्शवलेला खनिज तेलाचा ८८ ते ९२ डॉलर प्रति बॅरल हा दर २०१३ मध्ये होता. त्या वेळी तो १०० च्या वरही गेला होता. पण डिसेंबर २०१४ नंतर खनिज तेल ८० डॉलरच्या वर गेलेलेच नाही.
पेट्रोलियम सेलनुसार दर ७४.२१ डॉलर
देशातील पेट्रोलजन्य उत्पादनांचे नियोजन करण्यासाठी मंत्रालयाने विशेष सेल सुरू केला आहे. ‘पीपीएसी’ असे नाव असलेल्या सेलनेही सध्या खनिज तेलाची किंमत ७४.२१ डॉलर प्रति लीटर (वाहतूक खर्चासह) निश्चित केली आहे. पण तेल कंपन्या या सेलकडेही सपशेल कानाडोळा करीत आहेत.
मागील मेच्या तुलनेत मोठी वाढ
मागील वर्षी मे महिन्यात आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेलाची किंमत ४८ ते ५० डॉलर प्रति बॅरल होती. त्या वेळी याच तेल कंपन्या शिपिंगच्या खर्चासह ५८ ते ६० डॉलर प्रति बॅरलनुसार पेट्रोल-डिझेलची विक्री करीत होत्या.
कंपन्यांकडूनच इंधन ५ रुपये महाग
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा दर ७४ ते ७६ डॉलर प्रति बॅरल असताना सरकारी तेल कंपन्या ८८ ते ९२ डॉलर दरानुसार ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:54 AM2018-06-01T04:54:05+5:302018-06-01T04:54:05+5:30