नवी दिल्ली : मे महिन्यात भारतातील पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत तब्बल एक पंचमांश कपात झाली आहे. कोविड-१९ साथीचा हा परिणाम असला तरी इंधनांच्या वाढलेल्या दरांनीही त्यात थोडी भूमिका निभावली असावी, असे मानले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, मे महिन्यातील इंधनाची मागणी नऊ महिन्यांतील म्हणजेच ऑगस्टनंतरची सर्वांत कमी मागणी ठरली आहे. तेल मंत्रालयाशी संबंधित ‘पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण शाखे’च्या आकडेवारीनुसार, मेमधील इंधनाची मागणी आदल्या महिन्याच्या तुलनेत ११.३ टक्क्यांनी घटून १५.११ टनांवर आली. मागच्या वर्षाच्या तुलनेत ही घसरण १.५ टक्के आहे.इक्राचे उपाध्यक्ष प्रशांत वशिष्ट यांनी सांगितले की, प्रथमत: हा कोविड-१९ साथीचा परिणाम आहे, असे दिसते. तथापि, मागणी घसरण्यामागे तेच एकमेव कारण आहे, असे म्हणता येणार नाही. अलीकडे इंधनाच्या वाढलेल्या दरांचाही अल्प परिणाम यात असू शकतो. वशिष्ट यांनी सांगितले की, यावेळी स्थितीमध्ये लवकर सुधारणा होईल, असे प्रत्येकजण म्हणत आहे. त्यामुळे कदाचित पुढील तिमाहीत आपण साथपूर्व पातळीवर असू शकू.
- आर्थिक वृद्धीचे एक परिमाण समजल्या जाणाऱ्या डिझेलची मे महिन्यातील विक्री वार्षिक आधारावर ०.७ टक्क्यांनी वाढली असली तरी मागच्या महिन्याच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून ५.५३ दशलक्ष टनांवर आली आहे. एकूण इंधन विक्रीत डिझेलचा वाटा ४० टक्के असतो. त्यामुळे ते अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे मानले जाते. पेट्रोलची मे महिन्यातील विक्री वार्षिक आधारावर १२.४ टक्क्यांनी वाढली, मात्र आदल्या महिन्याच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून १.९९ दशलक्ष टनांवर गेली असल्याची माहिती संबंधीत सुत्रांनी दिली.