नवी दिल्ली : एका दिवसाच्या ब्रेकनंतर पेट्राेल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २८ आणि ३० पैसे प्रति लिटर एवढी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर इंधनाचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. मुंबईत पेट्राेलचे दर १०२ रुपये, तर दिल्लीत ९५.८५ रुपये प्रति लिटर झाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्राेलने शंभरी पार केली आहे.
सरकारी तेल कंपन्यांकडून सातत्याने पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ सुरू आहे. तेल कंपन्यांनी ४ मेपासून २३ वेळा इंधन दरवाढ केली आहे. जूनमध्येच पेट्राेल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे १.३५ आणि १.३९ रुपयांनी वाढल्या आहेत. पेट्राेलचे दर चेन्नईत ९७.१९ रुपये तर
काेलकाता येथे ९५.८० रुपये प्रति लिटर झाले. एक लिटर डिझेलचे दर मुंबईत ९४.१५ रुपये तर दिल्लीत ८६.७५ रुपयांवर पाेहाेचले. चेन्नई येथे डिझेलचे दर ९१.४२ तर काेलकातायेथे ८९.६० रुपये प्रति लिटरवर पाेहाेचले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७२ डॉलर्सवर
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची माेठी दरवाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी ७२ डाॅलर्स प्रति बॅरल एवढे हाेते. परिणामी, भारतात इंधनाची दरवाढ झाली आहे.
- याशिवाय केंद्र आणि राज्यांकडून आकारण्यात येणाऱ्या करांचाही वाटा माेठा असल्याने सर्वसामान्यांचे इंधन दरवाढीमुळे कंबरडे माेडले.