मुंबई : पेट्राेल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळालेला नाही. सरकारी तेल वितरण कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ३० आणि ३६ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्राेलचे दर ९५ रुपयांच्या जवळ पाेहाेचले असून, डिझेलचे दर नव्या उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. सरकारने शुल्क कमी करण्यास नकार दिला आहे, तसेच नव्या वर्षात कच्चे तेलही महागले असून दरवाढीमुळे वाहनचालक तसेच रिक्षा, टेेपो, ट्रकचालक संतापले आहेत.
मुंबईत पेट्राेलची किंमत ९४.९३ रुपये, तर डिझेलची किमत ८५.७० रुपये झाली आहे. राजधानी दिल्लीतही पेट्राेलचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले. दिल्लीत ८८.४१ रुपये पेट्राेल, तर ७८.७४ रुपये डिझेलचे प्रतिलीटर दर झाले आहेत. पेट्राेल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग पाच दिवस दरवाढ झालेली आहे. या पाच दिवसांमध्ये पेट्राेल १.५१ रुपये आणि डिझेल १.५६ रुपयांनी महागले आहे.
करांचे ओझे
उत्पादन शुल्क आणि कृषी अधिभार मिळून पेट्राेलवर ३२.९८ रुपये, तर डिझेलवर ३१.८३ रुपये शुल्क आकारले जाते. राज्याकडून व्हॅट व रस्ते अधिभार मिळून पेट्राेलवर २७ रुपये, तर डिझेलवर १७ रुपये कर आकारला जातो. त्यामुळे किमतीमध्ये करांचाच वाटा अधिक आहे.