नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. पेट्रोलनं नव्वदी, तर डिझेल 80च्या आसपास गेलं आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच आता खनिज तेल निर्यातदार देशांनी भारतात तेलाची निर्यात वाढवण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर लवकरच शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 80 डॉलर प्रतिबॅरलच्या वर गेला आहे. तसेच इराणकडूनही तेल निर्यात बंद होणार असल्यानं तेलाच्या प्रतिबॅरलची किंमत 100 डॉलरच्या पलिकडे जाण्याची शक्यता आहे. रशियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओपेक देशांच्या बैठकीत इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे आम्ही कोणत्याही देशाला अधिकचं तेल निर्यात करणार नसल्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इराणकडून तेल आयात करणा-या देशांची एक प्रकारे कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा भारतातही मोठा प्रभाव पडणार आहे. केंद्र सरकारनंही एक्साइज ड्युटी कमी करण्यास नकार दिल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता कमीच आहे.मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 90.22 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातील वाढदेखील सुरुच आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलचा दर 78.69 रुपयांवर पोहोचला आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर 6 जुलै ते 25 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे.
Fuel Price Hike : खनिज तेल निर्यातदार देशांचा उत्पादन वाढवण्यास नकार; पेट्रोलचा दर लवकरच शतक झळकावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 3:58 PM