मुंबई : अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वधारल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेल महागले आहे. सलग सातव्या दिवशी ही दरवाढ झाली असून, सोमवारी पेट्रोल १५ पैशांनी, तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे. हे वर्ष सुरू झाल्यापासून पेट्रालेच्या दरात ५५ पैशांची, तर डिझेलच्या दरामध्ये ७२ पैशांची वाढ झाली आहे.अमेरिकेने इराणच्या टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना हवाई हल्ल्याद्वारे ठार केल्यापासून दोन देशांत संघर्ष सुरू झाला असून, त्याचे परिणाम कच्च्या तेलाच्या दलावर झाले आहेत. सोमवारी कच्च्या तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढले. याची झळ संपूर्ण जगालाच बसली. भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करणार देश असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका भारताला आणि भारतीयांना बसू लागला आहे. भारत प्रामुख्याने इराक व सौदी अरेबियाकडून कच्चे तेल विकत घेतो. या आधी इराणहूनही कच्चे तेल आयात केले जात असे, पण अमेरिकेच्या निर्बंधांनंतर तेथून तेल घेणे भारताने बंद केले आहे.मुंबईत आज पेट्रोलचा दर एका लीटरला ८१ रुपये ५८ पैसे होता, तर डिझेलसाठी एका लीटरला ७२ रुपये 0२ पैसे मोजावे लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाचे दर कमी वा स्थिर होईपर्यंत पेट्रोल व डिझेलची दरवाढ होतच राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही डिझेलची दरवाढ अधिक असू शकेल, असे सांगण्यात येते.>मालवाहतूक, अन्नधान्यांवरही परिणामदेशात मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी बहुसंख्या वाहने डिझेलवर चालणारी आहेत. डिझेल महागल्याने मालवाहतुकीवरही त्याचा परिणाम होईल आणि त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्ये हे सारे प्रकार महाग होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. मालवाहतूकदारांनी दरवाढीची मागणी अद्याप केलेली नाही, पण ती होण्याची शक्यता आहे. प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात डिझेलच्या वाहनांनीच होत असल्याने प्रवासी भाडेही वाढू शकेल.
इंधनाचे दर वाढतच चालले; सलग सातव्या दिवशीही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:53 AM