Join us

इंधनाचे दर वाढले... डिझेल खातेय सर्व पैसे; शिल्लक काही उरेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 9:43 AM

मालवाहतूक भाड्यात देशभरात मोठी वाढ

नवी दिल्ली : डिझेलच्या वाढत्या दरामुळे मालवाहतूकदारांनी देशातील ९० टक्के मार्गांवरील मालवाहतूक भाड्यात वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. मालभाडे वाढल्यामुळे आधीच भडकलेली महागाई आणखी वाढणार आहे. मात्र, मालभाड्यात वाढ करण्यात आल्यानंतरही वाहतूकदारांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. उलट         वाहतूकदारांचे उत्पन्न कमी झाले असून, मालभाड्यातील वाढ डिझेलच्या दरवाढीने खाऊन टाकली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांतील वाढीचे ओझे अंतिमत: ग्राहकांच्या माथी येणे अटळ आहे, असे सूत्रांनी सांगितले. मालवाहतूकदारांनी ९० टक्के मार्गांवर एप्रिलमध्येच भाडेवाढ केली आहे. मानक संस्था क्रिसिल रिसर्चने जारी केलेल्या एका अहवालानुसार, देशातील १५९ वाहतूक मार्गांपैकी १४३ मार्गांवरील (९० टक्के) मालभाड्यात वाढ करण्यात आली आहे. वास्तविक, यादरम्यान ट्रकची वाहतूक स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे. 

सर्वच वस्तूंचे भाडे महागले

  • मालभाड्यातील वाढ ही सरसकट सर्व वस्तूंसाठी लागू केली आहे. 
  • एफएमसीजी, मुक्त वस्तू, खनिज तेल आदींच्या भाड्यात दोन अंकी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
  • पेट्रोलियम उत्पादने, स्टील आणि कपडे या वस्तूंच्या भाड्यातील वाढ एक अंकी असल्याचे दिसले आहे.

मालभाडे निर्देशांक १२९ अंकांवरमालभाड्यात वाढ झाल्यामुळे क्रिसिल रिसर्चचा अखिल भारतीय फ्रेट इंडेक्स म्हणजेच मालभाडे निर्देशांक १२९ अंकांवर पोहोचला. हा निर्देशांकाचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. ऑक्टोबर २०२० च्या बेस स्तरापेक्षा तो २९ अंकांनी अधिक आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेल