नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलच्या भडकलेल्या किंमतीमुळे नागरिक ई-वाहनांकडे वळत आहेत. मात्र, भारतातील सर्व दुचाकी व तीनचाकी वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहनांने घेण्यासाठी किती खर्च होवू शकतो? तर त्यासाठी तब्बल २८५ अब्ज डॉलरचा म्हणजे सुमारे २३ लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. ‘जागतिक आर्थिक मंच’ने (डब्ल्यूईएफ) ही माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, डब्ल्यूईएफने भारताच्या नीती आयोगासोबत एक श्वेतपत्रिका तयार केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दुचाकी व तीनचाकी वाहने असलेला देश आहे. सध्या देशात २५ कोटी दुचाकी व तीनचाकी वाहने आहेत. ही संख्या वाढून २७ कोटी झाली असावी, असा अंदाज गृहित धरून २३ लाख कोटींचा आकडा काढण्यात आला आहे.
मालक, चालक नाखूश
n वास्तविक दुचाकी व तीनचाकी श्रेणीतील वाहनांना सर्वांत आधी ईव्हीमध्ये रूपांतरित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र या वाहनांचे मालक आणि चालक हे दोघेही ईव्ही स्वीकारण्याच्या बाबतीत थोडेसे नाखूश असल्याचे दिसते.
n याचे मुख्य कारण ईव्हीसाठी येणारा मोठा खर्च हे आहे. याशिवाय विश्वासार्हतेची उणीव आणि फेरविक्रीच्या मूल्याबाबत अनिश्चितता ही कारणेही आहेतच.
नवीन मॉडेल्स बाजारात
इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांचे अनेक नवीन मॉडेल्स कंपन्यांनी बाजारात उतरविले आहेत. इलेक्ट्रिक कार्सची नवीन मॉडेल्सही लाँच करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू गती पकडत आहे.
भारताच्या शहरात परिवहन व्यवस्थेत बदल होत आहे. मात्र ईव्ही स्वीकारण्यात अजूनही लोक तेवढे उत्सुक दिसून येत नाहीत.
८०% वाहन हे भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांत दुचाकी व तीनचाकी आहेत.
४५ कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी बनवितात.