नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. या उड्डाणांसाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत करण्याचे आदेश नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान कंपन्यांना १६ एप्रिल रोजी दिले.
पहिल्या लॉकडाऊनच्या दिवसांत (२५ मार्च ते १४ एप्रिल,२०२०) प्रवाशाने देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट बुक केले असेल आणि विमान कंपनीला याच कालावधीतील प्रवासासाठी तिकिटाचे पैसे मिळाले असतील व प्रवाशाने ते बुकिंग रद्द करण्यास सांगून पैसे परत मागितले असतील तर विमान कंपनीने तिकीट रद्द करण्याचा खर्च (लेव्ही) वजा न करता त्याला पैसे परत केले पाहिजेत. प्रवाशाने बुकिंग रद्द करण्याची विनंती केलेल्या तारखेपासून तीन आठवड्यांत त्याला पैसे परत करावेत, असे यामध्ये स्पष्ट केले आहे.
प्रवाशाने पहिल्या लॉकडाउनच्या दिवसांत देशांतर्गत व देशाबाहेरच्या प्रवासासाठी तिकीट बुक केले आणि विमान कंपनीला दुसऱ्या लॉकडाउनच्या दिवसांतील प्रवासासाठी (१५ एप्रिल ते तीन मे, २०२०) त्याचे पैसे पहिल्या लॉकडाउनच्या दिवसांत (२५ मार्च ते १४ एप्रिल, २०२०) मिळाले असतील आणि प्रवासी ते पैसे परत
मागत असेल तर तिकीट रद्द करण्याचा खर्च (लेव्ही) वजा न करता पूर्ण पैसे त्याला द्यावेत. हा परतावा प्रवाशाने तिकीट रद्द करण्याची विनंती केल्यापासून तीन आठवड्यांत द्यावा, असे या आदेशात म्हटले
आहे.
या आदेशाचे पालन होत आहे की नाही यावर महासंचालनालयाला (नागरी उड्डयन) लक्ष ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
तक्रारींचा विचार करून निर्णय
पहिल्या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिल रोजी संपणार होती. ती आता तीन मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या दोन्ही कालावधीत देशांतर्गत व देशाबाहेरील विमानसेवा संपूर्णपणे बंद केलेली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढल्यानंतर विमान प्रवासी व विमान कंपन्यांवर होणारे परिणाम आणि प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींचा विचार केल्यानंतर मंत्रालयाने भारत सरकारच्या सहसचिव उषा पाधी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी केले आहेत.