मुंबई : चालू आर्थिक वर्षात किरकाेळ महागाईचा दर ५.२ टक्के एवढा राहणार असल्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. गेल्या पतधाेरण आढावा बैठकीत ताे ५.३ टक्के राहणार असल्याचे बँकेने म्हटले हाेते. यावेळी त्यात अल्प कपात करण्यात आली आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईच्या दरावर ताण राहू शकताे, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.महागाईने गेल्या वर्षभरापासून अख्ख्या जगाला छळले आहे. भारतात मात्र महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रब्बी पिकांचे यंदा विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती कमी हाेण्याचा अंदाज आहे. मात्र, यावेळी दुधाचे दर चढेच राहू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे.
पतधाेरण आणि क्रिकेटचे उदाहारण!
आर्थिक पतधाेरण आढाव्याबद्दल सांगताना शक्तिकांत दास यांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार प्रत्येक चेंडू खेळावा लागताे. त्याचप्रमाण आम्हीही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहाेत. गरज भासल्यास व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.
काय हाेणार परिणाम?
आरबीआयने रेपाे रेट न वाढविल्यामुळे कर्जदारांना माेठा दिलासा दिला आहे. गृह, वाहन, वैयक्तिक इत्यादी कर्जे घेणाऱ्यांचा इएमआय सध्यातरी वाढणार नाही.
असा वाढला रेपाे रेट (%)
- मे २०२० ४
- मे २०२२ ४.४०
- जून २०२२ ४.९०
- ऑगस्ट २०२२ ५.४०
- सप्टेंबर २०२२ ५.९०
- डिसेंबर २०२२ ६.२५
- फेब्रुवारी २०२३ ६.५०
५.२ टक्के राहू शकते महागाई
यंदा कच्च्या तेलाचे सरासरी दर ८५ डाॅलर्स प्रतिबॅरल एवढे राहू शकतात. तसेच मान्सूनही सरासरी एवढा राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महागाईचा दर ५.२ टक्के राहू शकताे.
व्याजदरवाढीला ब्रेक कशामुळे?
- आरबीआयने रेपाे रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांना सुखद धक्का मिळाला आहे. महागाईचा दर वाढलेलाच असल्यामुळे अमेरिकेसह युराेपमधील काही मध्यवर्ती बॅंकांनी ०.२५ टक्के व्याजदर वाढविला हाेता. मात्र, आरबीआयने यावेळी व्याजदर न वाढविण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते त्यामागची कारणे जाणून घेऊ या.
- आरबीआयने यावेळी जीडीपी वाढीचा दर ६.४ टक्क्यांवरून ६.५ टक्के एवढा केला आहे. यासाेबतच महागाईचा दरदेखील कमी अंदाजित केला आहे.
- आर्थिक स्थिरतेची चिंता निर्णयामागे जाणवते. गेल्या वर्षभरात २५० बेसिस पाॅइंटची वाढ केल्याचा परिणाम पाहून बॅंकेने हा निर्णय घेतला असावा.
- सध्या किमती स्थिर आहेत. कच्च्या तेलाचे दर किती वाढतात, त्यावर बॅंकेचे लक्ष असेल. फार वाढ हाेणार नाही, असा अंदाज आहे. तसेच मान्सूनही सरासरीएवढाच राहण्याचा अंदाज आहे.
- व्याजदर वाढीचा इतर देशांमध्ये काय परिणाम झाला, त्याचा अंदाज घेण्यात येत आहे. गरज भासल्यास व्याजदर वाढविले जाऊ शकतात, असेही आरबीआयने म्हटले आहे.