नवी दिल्ली - Future-Amazon वादामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला एक नवे वळण लागले आहे. या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी अंतरिम आदेश दिला आहे. तो आदेश हा फ्युचर ग्रुपसाठी एक मोठा विजय मानला जात आहे. दिल्ली हायकोर्टाने अॅमेझॉनच्या बाजूने देण्यात आलेल्या सिंगापूर लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर समुहाच्या आवाहनावरून हायकोर्टाने हा अंतरिम आदेश सुनावला आहे.
त्याबरोबरच दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणात पुढील सुनावणी १ फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित केले आहे. तसेच तोपर्यंत मध्यस्थतेबाबत देण्यात आलेल्या निर्णयावरील अंमलबजावणी स्थगित राहील.
हल्लीच भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय)सुद्धा फ्युचर समुहाच्या बाजूने निर्णय दिला होता. आयोगाने अमेरिकेतील ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला दुहेरी धक्का देताना अॅमेझॉन आण फ्युचर कुपन्स यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या डीलला सस्पेंड केलं होतं. त्याबरोबरच डीलची परवानगी देण्यासाठी महत्त्वाची माहिती लपवल्याबाबत अॅमेझॉनवर २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
हे संपूर्ण प्रकरण रिलायन्स आणि फ्यूचर समुहादरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या डीलशी संबंधित आहे. रिलायन्स फ्युचर डील अंतर्गत रिलायन्स समुहाला फयुचर समुहाच्या लॉजिस्टिक कंपन्यांची संपूर्ण मालकी मिळणार होती. मात्र फ्युचर समूह या डीलबाबत अमेरिकेची ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत कायदेशीर लढाईमध्ये गुंतली आहे.