नवी दिल्ली : ओला आणि उबेर यासारख्या राईड-हेलिंग कंपन्यांमुळेच देशातील कारची मागणी कमी झाली आहे. या कंपन्यांच्या घरपोच टॅक्सी सेवेमुळे तरुण खरेदीदारांना प्रवासासाठी स्वत:ची कार घेण्याची गरजच राहिली नाही. ते आता आपला बहुतांश पैसा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्वर खर्च करीत आहेत, असे प्रतिपादन मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी केले आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच ओला व उबेरमुळे कार विक्री घटल्याचे वक्तव्य केले होते. त्याला थेट समर्थन देणारे वक्तव्य आता भार्गव यांनी केले आहे. माजी नोकरशहा असलेल्या भार्गव यांनी पुढे सांगितले की, वाहनांवरील जीएसटीत तात्पुरती कपात करण्याची काहीच गरज नाही. कारण दीर्घकालीन पातळीवर त्याचा काहीच उपयोग वाहन उद्योगास होणार नाही. सुरक्षा व उत्सर्जन याविषयीच्या कठोर नियमांमुळे भारतात उत्पादित होणाऱ्या वाहनांचा दर्जा सुधारेल. त्यांना युरोपच्या बरोबरीत आणेल.
भार्गव यांनी म्हटले की, कारच्या किमती वाढल्या; पण त्या प्रमाणात भारतीयांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेकांनी कार खरेदीच्या योजना पुढे ढकलल्या आहेत. नव्या नियमांच्या पालनामुळे कारच्या किमतीत वाढ झालेली आहे.
>भारतात कर अधिक
भार्गव म्हणाले की, भारतातील वार्षिक दरडोई उत्पन्न २,२०० डॉलर आहे. तेच युरोपात ४० हजार डॉलर आहे. कार उत्पादनासाठीचे दर्जात्मक मापदंड मात्र युरोप आणि भारत यांना सारखेच आहेत. भारतातील करही युरोपच्या तुलनेत खूपच अधिक आहेत. इतकेच काय चीनपेक्षाही आपले कर अधिक आहेत. अशा परिस्थितीत वाहन उद्योगाकडून १०-१५ टक्के वृद्धीची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते.
ओला-उबेरमुळेच तरुणांचे कार खरेदीऐवजी गॅजेट्सना प्राधान्य
ओला आणि उबेर यासारख्या राईड-हेलिंग कंपन्यांमुळेच देशातील कारची मागणी कमी झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:35 AM2019-09-20T05:35:32+5:302019-09-20T05:35:40+5:30