मुंबई - दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या ‘गो फर्स्ट एअरलाइन’ने विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एक पुनरुज्जीवन योजना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयास (डीजीसीए) सादर केली असून, या योजनेचा डीजीसीए अभ्यास करणार आहे. दरम्यान, कंपनीने ६ जुलैपर्यंत सर्व उड्डाणे स्थगित केली आहे. गाे फर्स्टची विमानसेवा सुरू झाल्यास विमान प्रवासाचे भाडे कमी हाेण्याची शक्यता आहे.
वित्तीय संकटामुळे ३ मेपासून ‘गो फर्स्ट’ची उड्डाणे बंद आहेत. वाडिया परिवाराची मालकी असलेल्या ‘गो फर्स्ट’ने स्वत:च दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. तो राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) मंजूरही केला आहे. त्यानंतर आता कंपनीने पुनरुज्जीवन योजना सादर केली आहे. कंपनीच्या विद्यमान व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांशी या योजनेच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
सूत्रांनी सांगितले की, दिवाळखोरी प्रक्रियेचे समाधान व्यावसायी (रिझोल्युशन प्रोफेशनल) शैलेंद्र अजमेरा आणि अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी याबाबतीत डीजीसीएच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. डीजीसीएचे अधिकारी पहिल्यांदा उड्डाणांच्या तयारीचा आढावा घेतील.
डीजीसीए करणार ऑडिट
n गाे फर्स्टने सादर केलेल्या याेजनेचा डीजीसीए आढावा घेणार आहे.
n तसेच कंपनी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी किती सज्ज आहे, याचे ऑडिटदेखील करण्यात येणार आहे.
n त्यानंतरच डीजीसीए पुढील निर्णय घेईल. हे ऑडिट पुढील आठवड्यात हाेण्याची शक्यता आहे.
या प्रश्नांचे काय?
n गाे-फर्स्टला पुनरूज्जीवित करण्यासाठी आखलेली याेजना कागदावर चांगली आहे. मात्र, प्रत्यक्ष पैसे आहेत का?
n विमाने भाड्याने देणाऱ्या कंपन्यांची विमाने वापरण्यास सहमती आहे का?
n या कंपन्यांची काेट्यवधी रुपयांची देणी थकीत आहेत. त्याचे काय?
४५० कोटींचा अंतरिम निधी
सूत्रांनी सांगितले की, कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी अंतरिम निधी म्हणून ४५० कोटी रुपये देण्याचे कर्जदात्यांनी मान्य केले आहे. कंपनीचा एक दिवसाचा उड्डाण खर्च सुमारे दहा कोटी रुपये आहे. कंपनीकडे ३०० पायलटसह पुरेसे मनुष्यबळही आहे.
या शहरांत सेवा नाही
प्राप्त माहितीनुसार, बंद पडण्यापूर्वी कंपनी २९ देशांतर्गत ठिकाणांसाठी विमानसेवा देत होती.
पुनरुज्जीवन योजनेत ‘गो फर्स्ट’ने सुरुवातीला आपली उड्डाणे २९ वरून घटवून २३ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
कंपनी पुन्हा सुरू झाल्यास जयपूर, लखनौ, कन्नूर, पाटणा, वाराणसी आणि रांची या शहरासाठी उड्डाणे संचालित करणार नाही.
१ लाख काेटींची झाली ‘इंडिगाे’
- इंटरग्लाेब एव्हिएशन लिमिटेड या ‘इंडिगाे एअरलाइन्स’च्या मूळ कंपनीचे बाजार भांडवल १ लाख काेटी रुपयांवर पाेहाेचले आहे.
- हा टप्पा गाठणारी ‘इंडिगाे’ ही देशातील पहिलीच एअरलाइन्स कंपनी ठरली आहे.
- सेन्सेक्समध्ये इंडिगाेचा शेअर २,६१९.८५ रुपयांवर बंद झाला. शेअरचा भाव वधारल्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य १,०१,००७
काेटी रुपये झाले.
- कंपनीने गेल्याच आठवड्यात ‘एअरबस’ या विमान उत्पादक कंपनीला ५०० विमानांची ऑर्डर दिली आहे.
- एअरबसला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात माेठी ऑर्डर आहे. भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रात इंडिगाेचा सर्वाधिक ६१.४ टक्के वाटा आहे.
३०.५३% इंडिगाेचा शेअर वधारला आहे यावर्षी.