मुंबई : गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत अर्थात पहिल्या तीन तिमाहींत नफ्यापासून वंचित राहिलेल्या भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर शेवटच्या तिमाहीत अखेर नफ्याची मोहर लागल्यामुळे अखेर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय बाजारपेठेतील प्रमुख ३५० कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात १६.९ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदली गेल्यामुळे कंपन्या व पर्यायाने भांडवली बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, देशातील लहानमोठ्या अशा सुमारे ३५० कंपन्यांनी सुमारे ४ लाख १३ हजार कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद केली. त्याआधीच्या वर्षी विक्रीचा हा आकडा ३ लाख ९१ हजार कोटी रुपये इतका होता. तर आधीच्या वर्षीच ४७ हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात या कंपन्यांनी ५५ हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ३५० कंपन्यांपैकी १९६ कंपन्या या उत्पादन क्षेत्रातील आहेत. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या ताळेबंदात नफ्याची नोंद होणे, हे अर्थकारणातील सुधाराचे संकेत मानले जातात.
गेल्या दोन वर्षांप्रमाणे गेल्या आर्थिक वर्षातही अपुऱ्या मान्सूनचा फटका देशाच्या अर्थकारणाला बसला. कंपन्यांची कामगिरी खालावली. महागाईने डोके वर काढले. विस्ताराच्या योजनाही रखडल्या होत्या. मात्र तिसऱ्या तिमाहीनंतर आंतरराष्ट्रीय स्थितीत काहीसा सुधार आल्यामुळे आणि विशेषत: भारताच्या निर्यातीत वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर उमटला आहे.
भारतीय कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणे ही केवळ त्या कंपन्यांसाठीच जमेची बाजू नव्हे, तर याचा थेट परिणाम अर्थकारणाची टक्केवारी वाढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. त्याचसोबत भांडवली बाजारातील आगामी काळातील तेजी सूचित करत आहे.
कंपन्यांच्या या कामगिरीचा भांडवली बाजारावरही अनुकूल असा परिणाम लवकरच दिसेल. यासंदर्भात अर्थतज्ज्ञ डॉ. राकेश स्वामी यांच्या मते भारतीय कंपन्यांच्या नफ्यात झालेल्या वाढीचे विश्लेषण त्यांच्या कामगिरीच्या अनुषंगाने करताना काही प्रमुख मुद्दे विचारात घ्यावे लागतील. यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक भारतात समाधानकारकरीत्या झालेली नाही. परिणामी, भारतीय कंपन्यांनी नफा वाढविण्यासाठी त्यांच्या क्षमतेत वाढ करत ही कामगिरी नोंदविली आहे. आता आर्थिक वातावरणात काही प्रमाणात सुधार अथवा परिस्थितीत स्थैर्य दिसत आहे. यामुळे जर आता नवी गुंतवणूक झाली तर आधीच कामगिरीत लक्षणीय सुधार नोंदविलेल्या भारतीय कंपन्यांना आणखी जोमाने विकास करण्यासाठी बळकटी मिळेल. (प्र्रतिनिधी)
भारतीय कंपन्यांवर नफ्याची मोहर
गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत अर्थात पहिल्या तीन तिमाहींत नफ्यापासून वंचित राहिलेल्या भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर शेवटच्या तिमाहीत अखेर नफ्याची मोहर
By admin | Published: May 10, 2016 03:35 AM2016-05-10T03:35:50+5:302016-05-10T03:35:50+5:30