Join us

एक्स्प्रेसवेवर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

By admin | Published: September 27, 2014 11:18 PM

लॅपटॉप, मोबाईल्स जप्त : रायगड गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

लॅपटॉप, मोबाईल्स जप्त : रायगड गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
अलिबाग : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळच्या फुडमॉल येथे बसमधील प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप, टॅबसह बॅगा चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६ मोबाईल, दोन लॅपटॉप आणि दोन टॅब जप्त करण्यात आले.
सालिम शफलत हुसेन (रा. गोवंडी, मुंबई), मोसीम अमीरउद्दीन अन्सारी (रा. उत्तरप्रदेश) व आसिफ अहमद अन्सारी (रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून दादरहून पुण्यास जाणार्‍या शिवनेरी व एशियाड बसमधून हे तिघे प्रवास करीत असत. बसमधील प्रवाशांची व त्यांच्याजवळील किमती ऐवजाची ते पहाणी करीत असत. खोपोलीजवळच्या फूडमॉल येथे या बसेस चहापाण्यासाठी थांबल्यावर, प्रवासी बसमधून खाली उतरताच ही टोळी त्यांचा किमती ऐवज असणार्‍या बॅगा घेऊन पोबारा करीत. २०११ पासून सुमारे ३० ते ३५ अशा चोरीच्या घटना येथे घडल्या आहेत.
]

अशी केली कारवाई...
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी आपल्या पथकासह दादर येथूनच साध्या वेशात प्रवासाची योजना आखली. त्यानुसार दादार येथून बसमध्ये चढणारा प्रत्येक प्रवासी व त्याचे सामान यांची सुप्त नोंद करण्यात आली. पनवेलपर्यंत प्रवाशांच्या हालचाली टिपत असताना त्यांना तीन प्रवासी संशयास्पद वाटले. या तिघांकडे स्वत:चे सामान नव्हते. बस खोपोली फूडमॉल येथे आल्यावर या तिघांनी दुसर्‍या प्रवाशाच्या बॅगा उचलल्या व ते बसमधून उतरले, त्याच वेळी त्यांना पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.
-----------
चोरलेल्या मालाची ऑनलाइन विक्री
टोळीतील सालिम शफलत हुसेन, मोसीम अमीरउद्दीन अन्सारी व आसिफ अहमद अन्सारी या तिघांकडे चौकशी केली असता चोरलेले मोबाईल, लॅपटॉप, टॅबसारख्या अन्य मौल्यवान वस्तू तत्काळ विक्रीसाठी ते एका वेबसाईटवर टाकत असल्याचे त्यांनी कबूल केले.