Join us

Gautam Adani: अदानींचे ग्रह फिरले! गेल्या १५० दिवसांत दर सेकंदाला ५.७७ लाखांचं झालं नुकसान; कसं जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 9:32 AM

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होण्याचा सिलसिला २४ जानेवारीपासून सुरू आहे. पण आजपासून जवळपास १५० दिवसांपूर्वी याच गौतम अदानींची संपत्ती जवळपास १५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होण्याचा सिलसिला २४ जानेवारीपासून सुरू आहे. पण आजपासून जवळपास १५० दिवसांपूर्वी याच गौतम अदानींची संपत्ती जवळपास १५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस यांना मागे टाकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर लवकरच ते बर्नार्ड अरनॉल्ट यांनाही मागे टाकून दुसरं स्थान मिळवतील अशी शक्यता होती. पण तसं होऊ शकलं नाही. अदानींच्या संपत्तीत सातत्यानं घट होण्यास सुरुवात झाली. अदानींना आतापर्यंत झालेलं नुकसान पाहता गेल्या १५० दिवसांत दर सेकंदाला ५.७७ लाख रुपयांचं नुकसान त्यांना भोगावं लागलं आहे. 

अदानींची एकूण संपत्ती जेव्हा १५० अब्ज डॉलर होतीब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांची आजवरची सर्वाधिक कमाईची मजल १५० अब्ज डॉलर इतकी होती. २० सप्टेंबर २०२२ रोजी गौतम अदानी आपल्या संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर होते. जर भारतीय रुपयात पाहिले तर त्यावेळी अदानींकडे १२.३३ लाख कोटी रुपये होते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या इतिहासात, आशियातील कोणत्याही उद्योगपतीकडे अशी निव्वळ संपत्ती आजपर्यंत कोणत्याही भारतीयाकडे नव्हती. ते आशियातील पहिले उद्योगपती बनले ज्याची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर इतकी झाली होती. गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने होणारी वाढ हे त्याचं कारण होतं.

अदानींची पडझड कशी सुरू झाली?२० सप्टेंबरनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण दिसून आली. हा तो काळ होता जेव्हा जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीचा माहोल होता. जगभरातील मध्यवर्ती बँकांव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँक देखील पॉलिसी रेट वाढवत होती. महागाईचे आकडे जगभरातील सरकारांवर दबाव आणत होते. त्यामुळे शेअर्समध्ये सतत घसरण होत होती आणि इलॉन मस्कपासून बर्नार्ड, जेफ बेझोस आणि उर्वरित अब्जाधीशांच्या संपत्तीवर नकारात्मक परिणाम दिसून येत होते. गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आणि २० ऑक्टोबरपर्यंत ते १२५ बिलियन डॉलरच्या जवळ आले. पुढच्या एका महिन्यासाठी म्हणजे २० नोव्हेंबरपर्यंत त्यांची संपत्ती १३० अब्ज ते १३५ बिलियन डॉलरपर्यंत राहिली. पुढे एका महिन्यात थेट १२१ अब्ज डॉलरपर्यंत घसरले.

२० जानेवारीनंतर सर्वात मोठी घसरणगौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण २१ जानेवारीपासून सुरू झाली. तोपर्यंत हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला नव्हता. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, परंतु कुणाला काही अंदाज नव्हता की आशियातील सर्वात मोठा उद्योगपती एका मोठ्या कचाट्यात सापडणार आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला आणि अदानींच्या शेअर्सनं गटांगळी घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार ३ फेब्रुवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५९ अब्ज डॉलरवर आली, म्हणजे त्यांची निम्म्याहून अधिक संपत्ती नष्ट झाली आहे. 

१५० दिवसांत ९१ अब्ज डॉलर्स राखगौतम अदानी यांची संपत्ती त्यांनी आतापर्यंत गाठलेल्या श्रीमंतीच्या सर्वोच्च मिळकतीपेक्षा आज तब्बल ९१ बिलियन डॉलरनं कमी झाली आहे. आता भारतीय रुपयात याचा अंदाज घ्यायचा झाला तर सुमारे ७.५० लाख कोटी रुपयांचे केवळ नुकसान अदानींना झाले आहे. गौतम अदानी यांना चालू वर्षात म्हणजेच ३५ दिवसांत ६१.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत आशिया खंडातील कोणत्याही व्यावसायिकाचे इतक्या कमी वेळेत इतके नुकसान झालेले नाही. हे आकडे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

१५० दिवस आणि दरसेकंदाला ५.७७ लाखांचे नुकसानगौतम अदानी यांचे गेल्या १५० दिवसांत मोठे नुकसान झाले आहे. दररोज ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. गौतम अदानी यांना दर तासाला २०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांचे दर मिनिटाला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याची दर सेकंदात विभागणी करायची झाली तर प्रत्येक सेकंदाला ५.७७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :गौतम अदानी