Adani Power share price: गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. अदानी पॉवरनं कर्जबाजारी कंपनी लॅन्को अमरकंटक पॉवर ही कंपनी लिलावाद्वारे विकत घेतली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बुधवारी झालेल्या लिलावात अदानी पॉवरला लॅन्को अमरकंटक पॉवरसाठी विजयी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आलं.
अदानी पॉवरनं ४१०१ कोटी रुपयांमध्ये हा करार केला आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सरकारी कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या (पीएफसी) नेतृत्वाखालील कन्सोर्टियमनंदेखील या कंपनीमध्ये स्वारस्य दाखवलं होतं. परंतु अखेरच्या लिलावात त्यांनी सहभाग घेतला नाही.
अनिल अग्रवाल यांचीही कंपनी स्पर्धेत
लॅन्को अमरकंटक पॉवरला सप्टेंबर २०१९ मध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेसाठी स्वीकारण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे प्रक्रियेला विलंब झाला.अनिल अग्रवाल यांच्या मालकीची ट्विन स्टार टेक्नॉलॉजीज ही कंपनी देखील ही कंपनी खरेदी करण्यासाठी इच्छुक होती. या कंपनीनं ३००० कोटींचा प्रस्ताव दिला होता परंतु कर्जदारांनी जानेवारी २०२२ मध्ये तो नाकारला.
अदानी पॉवरला गुड न्यूज
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं अदानी पॉवरचं बँक सुविधांचं रेटिंग अपग्रेड करून 'IND AA-' आणि स्टेबल आऊटलूक असं केलं आहे. रेटिंग एजन्सीनुसार, ते वाढवण्यामागे लोहारा कोळसा ब्लॉकशी संबंधित नियामक मुद्दे आहेत. इंडिया रेटिंग्जनं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत नियामक दावे प्राप्त झाल्यामुळे कंपनीच्या कर्जामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
शेअरची स्थिती काय?
शुक्रवारी, आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आणि तो 575 रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, एक्सपर्ट यावर बुलिश दिसत आहेत. अदानी पॉवरचे शेअर्स 22 पट ईव्ही/एबिटाच्या आधारे 707 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, अशी माहिती यापूर्वी अलीकडेच व्हेंचुरा सिक्युरिटीजनं सांगितलं होतं.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)