Gautam Adani Succession Plan: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना आखली आहे. गौतम अदानी आता ६२ वर्षांचे आहेत. गौतम अदानी कधी निवृत्ती घेणार, कोणाच्या हाती धुरा सोपवणार आणि पुढचा प्लॅन काय असणार याबाबत आता मोठी माहिती समोर आलीये.
ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं एका मुलाखतीचा हवाला देत, २०३० च्या सुरुवातीच्या महिन्यांत अदानी आपल्या मुलांकडे या समूहाची कमान सोपवू शकतात असा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांनी आपली दोन मुलं आणि दोन पुतण्यांना काही आश्चर्यकारक प्रश्न विचारले. त्यांना अदानी समूहाचं विभाजन करून वेगळं होणं योग्य वाटतंय की त्यांना एकत्र राहणंच योग्य वाटेल? असे प्रश्न त्यांनी केले. गौतम अदानी यांनी त्यांना या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
पहिल्यांदा भाष्य
गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच आपल्या उत्तराधिकाराविषयी भाष्य केलं आहे. व्यवसाय टिकून राहण्यासाठी उत्तराधिकारी अतिशय महत्त्वाचा आहे. पुढच्या पिढीकडे समूहाची कमान पद्धतशीरपणे पोहोचली पाहिजे. याचा पर्याय आपण पुढच्या पिढीकडे सोपवला आहे, असं अदानींनी ब्लूमबर्गला सांगितलं.
अदानी समूहाच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे झालं तर यात १० लिस्टेड कंपन्या आहेत. त्यांच्या कंपन्यांचं मार्केट कॅप सुमारे २१.३ ट्रिलियन डॉलर आहे. पायाभूत सुविधा, बंदरे, शिपिंग, सिमेंट, सोलर एनर्जी आदी क्षेत्रांत समूहाचा व्यवसाय आहे.
चौघांनाही समान हिस्सा
दुपारच्या जेवणादरम्यान गौतम अदानी यांनी घरच्यांना आपल्या उत्तराधिकारी योजनेबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांची मुलं करण आणि जीत तसंच पुतणे प्रणव आणि सागर यांनी त्यांचा हेतू समूहाचं कामकाज आपल्या कुटुंबाप्रमाणे चालवण्याचा असल्याचं म्हटलं. जेव्हा गौतम अदानी हे अदानी समूहातून निवृत्ती घेतील तेव्हा पुढची पिढी ते कुटुंब म्हणून चालवेल, असंही ते म्हणाले. ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार, चारही वारसांना कौटुंबिक ट्रस्टमध्ये समान हिस्सा मिळेल.