अदानी समूहाच्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी पोर्ट्सच्या शेअर्सनं आज उच्चांकी स्तर गाठला. सोमवारी कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 1345 रुपयांवर उघडले. परंतु काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सनं इंट्रा-डे उच्चांकी 1356.50 रुपयांच्या स्तराला स्पर्श केला. हा देखील कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्सच्या किमती वाढण्यामागील कारण म्हणजे येणारा एक अहवाल आहे.
३३ टक्क्यांची वाढ
अदानी पोर्ट्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर कार्गो व्हॉल्यूम्समध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये एकूण ३५.४ एमएमटी कार्गो हाताळण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. जे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक आहे.
कंपनीनं चालू आर्थिक वर्षाच्या ११ महिन्यांपर्यंत (फेब्रुवारी २०२४) ३८२ एमएमटी कार्गो हाताळले आहेत. अशा परिस्थितीत ४०० एमएमटीचा आकडा पार करण्यात ते यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनीनं आतापर्यंत कार्गो व्हॉल्यूम हाताळण्याच्या बाबतीत वार्षिक आधारावर २१ टक्क्यांची वाढ साधण्यात यश मिळवलं आहे.
एक्सपर्ट बुलिश
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल अदानी पोर्ट्सच्या बाबतीत बुलिश दिसत आहेत. कंपनीनं यासाठी १४१० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना ७० टक्क्यांचा फायदा झालाय. तर या कालावधीत बेंचमार्क निफ्टी ५० निर्देशांकानं १४ टक्क्यांची उसळी घेतली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)