Join us

अदानी कंपनीची बिग डील! सर्वांत मोठ्या सरकारी कंपनीला पुरवणार कोळसा; कोट्यवधींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 10:31 AM

अदानी समूहाला १७ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चात मेरठ ते प्रयागराज या ५९४ किमी लांबीच्या सहा पदरी गंगा एक्सप्रेसवेचे काम मिळाले होते.

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी कोळसा कमतरतेमुळे देशावर वीज संकट निर्माण झाले होते. त्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकारी मालकीच्या एनटीपीसी लिमिटेडने दोन वर्षांत प्रथमच कोळसा आयातीसाठी निविदा काढली. यानुसार, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादक कंपनीला परदेशी कोळसा पुरवठा करण्याचे मोठे काम मिळाले आहे. देशात आयात करण्यात येत असलेला थर्मल कोळशाचे सर्वात मोठे व्यापारी असलेल्या अदानी यांना वीज कंपनीला दहा लाख टन कोळसा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.

इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध असतानाही परदेशातून कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन ऊर्जेच्या साधनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत असले तरी पुढील काही वर्षांमध्ये त्याचा वापर वाढण्याचा अंदाज आहे.

भविष्यात हाही करार होण्याची शक्यता

एका वृत्तानुसार, सरकारी मालकीची दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन लिमिटेड कोलकाता देखील अदानींकडून त्यांच्या पॉवर प्लांटना समान प्रमाणात पुरवठा करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. भविष्यात हा करार होण्याची शक्यता आहे. कोळशाच्या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे देशांतर्गत वीज उत्पादकांवर त्यांचा साठा वाढवण्याचा दबाव आहे. वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षी देशाला टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे काही राज्यांमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आणि विजेवर चालणाऱ्या उद्योगांवर याचा परिणाम झाला.

दरम्यान,  उत्तर प्रदेशमध्ये, अदानी समूहाला १७,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चात मेरठ ते प्रयागराज या ५९४ किमी लांबीच्या सहा पदरी गंगा एक्सप्रेसवेचे काम मिळाले होते. यामध्ये आयआरबी पायाभूत सुविधा विकासकांचाही समावेश आहे. हा  एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :अदानीकेंद्र सरकार