Gautam Adani Bribery Case: उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानींसह सात जणांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, अदानींविरोधात अटक वॉरंटही जारी होण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाने आरोप फेटाळले
सौरऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप अदानींवर आहे. 20 वर्षांत या प्रकल्पांमधून समूहाला दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अदानीविरुद्ध वॉरंट जारी होऊ शकते
भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा म्हणाले, अदानी आणि इतर सात जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार यूएस ऍटर्नी ब्रायन पीस यांना आहे. भारताप्रमाणे जर त्या देशाचा प्रत्यार्पण करार असेल, तर सार्वभौम राष्ट्रांमधील द्विपक्षीय करारानुसार, मूळ देशाने प्रत्यार्पण केलेल्या व्यक्तीला अमेरिकेकडे सोपवले पाहिजे. 1997 मध्ये भारत-यूएस प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी करण्यात आलेल्या कायद्यानुसार मूळ देशाने पालन करणे आवश्यक आहे.
गौतम अदानी यांच्यावर काय आरोप?
न्यू यॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसाठी यूएस ऍटर्नी पीस यांनी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर (समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक) आणि त्याचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनीत एस यांच्याविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांच्या आधारे अमेरिकन गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी मिळवल्याचा आणि त्या पैशांचा वापर लाच देण्यासाठी केल्याचा आरोप आहे.