Join us  

अदानींचं कमबॅक! गेल्या ३ तासांत कमाई ३,५५,३७,०२,७५,००० रुपयांनी वाढली; श्रीमंतांच्या यादीतही झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:10 PM

अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानंतर मोठा धक्का बसलेला 'अदानी ग्रूप' आता सावरताना दिसतो आहे.

नवी दिल्ली-अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानंतर मोठा धक्का बसलेला 'अदानी ग्रूप' आता सावरताना दिसतो आहे. अदानी ग्रूप पैकी तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये आता तेजी पाहायला मिळत असून गौतम अदानींच्या संपत्तीतही वाढ होत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचलेले गौतम अदानी हिंडनबर्गच्या अहवालानंतर थेट २१ व्या स्थानवर घसरले होते. इतका मोठा तोटा सहन करावा लागल्यानंतर आता अदानींनी कमबॅक केल्याचं दिसत आहे. 

२४ जानेवारी रोजी हिंडनबर्गनं अदानी ग्रूपवर फसवणूकीचा आरोप करत कंपनीनं शेअर्सची किंमत फुगवली असल्याचं म्हटलं होतं. यासंबंधीचा सविस्तर अहवालच हिंडनबर्गनं प्रसिद्ध केला होता. या अहवालानंतर अदानी ग्रूपला मोठा धक्का बसला आणि सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ लागली. इतकंच नव्हे, तर अदानींना २० हजार कोटींचा देशाचा पहिलीवहिला सर्वात मोठा एफपीओ देखील मागे घ्यावा लागला होता. आता कालपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Adani Enterprises चा शेअर पुन्हा २ हजार पार, Adani Ports चीही कामगिरी दमदार!

अदानी एन्टरप्राइजेस, अदानी पोर्ट आणि अदानी पावरच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. शेअर्समधील वाढीसह गौतम अदानींच्या संपत्तीतही वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात अदानींची संपत्ती ५८ अब्ज डॉलरवरुन आता ६३.७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 

टॉप-२० मध्ये अदानींचं पुनरागमनफोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रत्येक क्षणी वाढ होताना दिसत आहे. गौतम अदानी यांची संपत्ती ६३.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अदानी यांच्या संपत्तीत अवघ्या तीन तासांत ७.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत ४.३ अब्ज डॉलरची वाढ झाली. म्हणजेच काही तासांतच त्यांची संपत्ती ३,५५,४६,६१,६५,००० रुपयांनी वाढली. अदानींच्या वैयक्तिक संपत्तीत वाढ झाल्यामुळे गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत २० व्या स्थानावरून १७ व्या स्थानावर पोहोचले आहेत. संपत्ती वाढीचा वेग अजूनही सुरूच आहे. फेसबुकचा मार्क झुकरबर्ग सध्या १६ व्या क्रमांकावर आहे.

अदानी शेअर्स वाढलेगौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सनं १३% वाढीसह २०३६ रुपयांची पातळी ओलांडली. दुसरीकडे, अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढले असून एक शेअर १३१४ रुपयांच्यावर पोहोचला. त्याचवेळी, अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये ७.६ टक्के वाढ झाली. अदानी ग्रीन एनर्जी आणि टोटल गॅसचे शेअर्स वगळता अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स आजही तेजीत आहेत.

टॅग्स :गौतम अदानी