काही दिवसांपूर्वी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले होते. ते लवकरच पहिल्या स्थानावर जातील, असा अंदाज बांधला जात होता. पण, आता ते या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. गुरुवारी त्यांच्या एकूण संपत्तीत 3.51 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 28,599 कोटी रुपयांची मोठी घसरण झाली.
अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती आता 128 अब्ज डॉलर आहे आणि ते बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांच्या मागे आहेत. काही दिवसांपूर्वीच अदानी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते, परंतु अलीकडच्या काही दिवसांत शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती सुमारे $20 बिलियनने घसरली आहे.
एलोन मस्क पहिल्या स्थानावर कायम
दरम्यान, अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos) $ 138 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या आणि अर्नॉल्ट ($ 129 अब्ज) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) $240 अब्ज संपत्तीसह पहिल्या स्थानावर कायम आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी त्यांच्याही संपत्तीमध्ये $ 13.3 अब्जची मोठी घसरण झाली आहे.
अदानींच्या या कंपन्यांमध्ये घसरण
गुरुवारी अदानी समूहाच्या बहुतांश लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 2.17 टक्क्यांनी घसरली. तसेच, अदानी ट्रान्समिशन 5.25 टक्के, अदानी टोटल गॅस 1.28 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 2.25 टक्के आणि अदानी पोर्ट्स 1.37 टक्क्यांनी घसरली. अदानी पॉवर आणि अदानी विल्मार यांना किरकोळ फायदा झाला.
मुकेश अंबानींच्या संपत्तीतही घट
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर कायम आहेत. गुरुवारी रिलायन्सच्या शेअरने सहा महिन्यांची नीचांकी पातळी गाठली होती. गुरुवारच्या घसरणीमुळे अंबानींच्या संपत्तीत $169 दशलक्षची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती $80.3 अब्जवर आली आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $9.65 बिलियनने घसरली आहे.