गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या उपकंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (SECU) मोठी ऑर्डर मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेसनं शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडला 11 जानेवारी 2024 रोजी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून लेटर ऑफ अवॉर्ड (LOA) मिळाला आहे. ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन स्कीम (Tranche-I) अंतर्गत भारतात इलेक्ट्रोलायझर्ससाठी उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी हा आदेश मिळाल्याचं सांगण्यात आलंय.
काय आहेत डिटेल्स?
ऑर्डरच्या अटींनुसार, अदानी न्यू इंडस्ट्रीजला भारतात १९८.५ मेगावॅट/वर्ष इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमता स्थापित करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. हा प्रकल्प इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (PLI) अंतर्गत येतो.
काय आहे शेअरची स्थिती?
शुक्रवारी अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स २३.८० किंवा ०.७७ टक्क्यांच्या वाढीसह ३१०४.२५ रुपयांवर बंद झाले. या शेअरनं १६ जानेवारी २०२३ रोजी ३७३९ रुपयांच्या स्तर गाठला होता. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी या शेअरची किंमत १०१७ रुपये होती. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)