आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यांनी 2022 IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, गेल्या एका वर्षात अदानी यांच्या मालमत्तेत 116 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण 5,88,500 कोटी रुपयांची भर पडली आहे. दर दिवसाला अदानी यांनी 1,612 कोटी रुपये कमावले आहेत. रिपोर्टमध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 10,94,400 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
गौतम अदानी हे सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आहेत. टेस्लाचे एलन मस्क अदानी यांच्या पुढे आहेत. हुरुन इंडियाचे एमडी अनस रहमान जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत अदानी समूहाने अधिग्रहण आणि ऑर्गेनिक ग्रोथवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे, मालमत्ता 1,440 टक्क्यांनी वाढली आहे. समुहाच्या 7 कंपन्या शेअर बाजारमध्ये लिस्टेड आहेत. गेल्या काही वर्षांपासून या कंपन्यांची वाढ सातत्याने होत आहे.
2022 हे वर्ष अदानी यांच्या अफाट संपत्तीच्या वाढीसाठी लक्षात राहील, असे रिपोर्ट म्हटले आहे. एक लाख कोटी मार्केट कॅप असलेल्या सात कंपन्या निर्माण करणारे ते एकमेव भारतीय आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी किंवा इतर अब्जाधीशांच्या तुलनेत अदानी यांची संपत्ती 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे देखील महत्त्वाचे आहे की 2012 मध्ये अदानी यांची संपत्ती अंबानींच्या संपत्तीच्या जेमतेम एक षष्ठांश होती.
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, 10 वर्षांत प्रथमच त्यांनी या यादीतून आपले अव्वल रँकिंग गमावले आहे. रिपोर्टमध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती 7.94 लाख कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षांवर नजर टाकली तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत 115 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.