Join us

Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 12:27 PM

Gautam Adani Group News : अनेक बँका अदानी समूहाच्या एका कंपनीवर फिदा आहेत. यामागे एक मोठं कारण आहे.

Gautam Adani Group News : अनेक बँका अदानी समूहाच्या (Adani Group) एका कंपनीवर फिदा आहेत. यामागे एक मोठं कारण आहे. ही कंपनी दुसरी कोणतीही अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी म्हणून ओळखली जाणारी  'अदानी एंटरप्रायझेस' (Adani Enterprises) आहे. दोन दिवसांपूर्वीच या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ६६४ टक्क्यांनी वाढून १,७४२ कोटी रुपये झाला आहे.प्रत्यक्षात या बँका अदानी एंटरप्रायझेसच्या एका प्रकल्पात रस दाखवत आहेत. या बँकांनी या प्रकल्पासाठी कर्ज वाटप करण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचा समावेश आहे.

२० हजार कोटींचे कर्ज मंजूर

अदानी समूह पेट्रोकेमिकल्स बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारी आहे. समूहाचा हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या प्रकल्पासाठी प्रमुख कर्जदार आहे. या प्रकल्पासाठी एसबीआयने अदानी समूहाला २० हजार कोटी रुपयांच कर्ज मंजूर केलं होतं. एसबीआय आता या कर्जाचा मोठा भाग विकण्याचा विचार करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एसबीआयनं १५ वर्षांच्या कर्जाची किंमत ९.२५% ठेवली होती.

काय आहे प्रकल्प?

कंपनीचा हा प्रकल्प गुजरातमधील मुंद्रा येथे आहे. याची किंमत ४ अब्ज डॉलर्स इतकी (सुमारे ३४ हजार कोटी रुपये) असल्याचं सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प पॉलीविनाइल क्लोराईडशी (पीव्हीसी) संबंधित आहे. २ दशलक्ष टनांचा हा पीव्हीसी प्रकल्प अदानी समूहाचा पेट्रोकेमिकल क्षेत्रात होणारी पहिली एन्ट्री आहे. यामुळे भारताची प्लास्टिक पॉलिमर निर्मिती क्षमता दुप्पट होण्याची शक्यता आहे. रेनकोट, वायर, प्लॅस्टिक पाईप आदी गोष्टींव्यतिरिक्त वैद्यकीय उपकरणं तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

एसबीआयला फायदा काय?

कर्ज विकल्यानं बँकेची एखाद्या विशिष्ट संस्थेतील गुंतवणूक कमी होण्यास मदत होते. समूहातील इतर कंपन्यांना कर्ज दिल्यास त्याची मर्यादाही खुली होते. गुजरातमधील मुंद्रा येथे अदानी एंटरप्रायझेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड पॉलिविनाइल क्लोराईड (पीव्हीसी) प्रकल्पासाठी एसबीआयचं कर्ज मंजूर करण्यात आले.

बँकांना स्वारस्य का?

तज्ज्ञांच्या मते अदानी समूहाचा हा प्रकल्प खूप मोठा आहे. बँकांनी यात सहभागी होण्याचं महत्त्वाचं कारण हे उच्च दर्जाचं क्रेडिट आहे. प्रकल्प, कर्जाची रक्कम आणि समूहाचे पतमानांकन यामुळे अनेक बँका सहभागी होण्यास तयार आहेत.

पीव्हीसीच्या देशांतर्गत उत्पादनामुळे भारताला आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. आर्थिक बाबी आणि पायाभूत सुविधांवरील उच्च खर्चामुळे पीव्हीसीची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६ च्या अखेरीस कार्यान्वित होईल, अशी अदानींची अपेक्षा आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानीव्यवसायआयसीआयसीआय बँकएसबीआय