Join us

Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:25 AM

अदानी समूह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अदानी समूहाची एक कंपनी मोठं पाऊल उचलणार आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून येत आहे.

Adani Group : अदानी समूह पुन्हा एकदा मोठा निधी उभारण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अदानी एनर्जी सोल्यूशन्स पुढील आठवड्यात क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे (QIP) एक अब्ज डॉलर (८४०० कोटी रुपये) उभारणार आहे. अदानी समूहाच्या पॉवर ट्रान्समिशन युनिटच्या संचालक मंडळानं मे महिन्यात १२,५०० कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली होती.

मागणीवर असेल कंपनीची नजर

या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, जीक्यूजी पार्टनर्स कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीसोबत रोड शो केल्यानंतर एका महिन्यानंतर अदानी एनर्जी क्यूआयपी आणण्यास तयार आहेत. तर २ अमेरिकन फंड आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडांनीही रस दाखवला आहे. रिपोर्टनुसार, क्यूआयपी या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते. यातून ७०० ते ८०० दशलक्ष डॉलर्स उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. पण मागणी जास्त असेल तर ती १ अब्ज डॉलरपर्यंत नेली जाऊ शकते. अदानी एनर्जी सोल्युशन्सनं आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जेफरीज यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अदानी एनर्जीच्या वतीनं कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वर्षभरानंतरचं मोठं पाऊल

गेल्या वर्षी एफपीओनंतर प्रथमच अदानी समूहाची कंपनी निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अदानी एंटरप्रायझेसनं २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ जारी केला होता. पण नंतर हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर माघार घेण्यात आली.

कंपनीच्या शेअरमध्ये वाढ

बीएसईमध्ये आज अदानी एनर्जीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर १.६२ टक्क्यांनी वधारून १,०६९ रुपयांवर व्यवहार करत होता. बीएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १२५० रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार