Join us

Adani ग्रुपचा आता विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; ७१ वर्षे जुनी ‘ही’ कंपनी खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 9:50 AM

देशातील २७ शहरांत व्यवसाय असलेल्या ७१ वर्षे जुन्या कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे.

नवी दिल्ली: वीज, खाद्य उद्योगापासून ते अगदी ड्रोनपर्यंत अनेकविध क्षेत्रात Adani ग्रुप कार्यरत आहे. कोरोना संकट काळात अदानी समूहाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे पाहायला मिळाले. यातच आता अदानी समूह नवनवीन क्षेत्रात आपल्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आता विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखली जात असून, या क्षेत्रात ७१ वर्षे कार्यरत असणाऱ्या एका कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने चालवल्याचे सांगितले जात आहे. 

विमान सेवा क्षेत्रात भारतात सर्वाधिक मोठी कंपनी असलेल्या एअर वर्क्स ग्रुप (Air Works Group) या कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याच्या प्रयत्नात अदानी ग्रुप आहे. सुमारे ७१ वर्षे जुन्या कंपनीचा विस्तार देशातील २७ शहरात आहे. एअर वर्क्स सर्व्हिस भारतीय कंपन्या जसे इंडिगो, गो-एअर आणि विस्तारासोबत इतर विदेशी विमान सेवा कंपन्या लुफ्थांसा, टिश एअरलाइंस, फ्लाय-दुबई, एतिहाद अशा अनेक कंपन्यांची विमानांची सर्व्हिसिंग करते. याशिवाय, भारतीय नौसेनेची विमानांनाही अशा प्रकारची सेवा पुरवते. या महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीने बोइंगसोबत भारतीय नौसेनेसाठी तीन पी-८१ लॉंग-रेंज मेरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्टच्या देखभालीसाठी करार केला आहे.

देशातील २७ शहरात आहे सेवा विस्तार

एअर वर्क्स ग्रुपचा व्यवसाय भारतातील २७ शहरांमध्ये पसरलेला आहे. सध्या या क्षेत्रात ५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. त्यात एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस आणि जीएमआर टेक्निक्स या सरकारी कंपन्यांच्या नावांचाही समावेश आहे. तसेच अदानी समूहाकडे सध्या देशातील ७ विमानतळाचे संचालनाचे काम आहे. या विमानतळांमध्ये अहमदाबाद, लखनौ, तिरुअनंतपुरम, जयपूर, गुवाहाटी आणि मंगळुरूसह देशातील दुसऱ्या क्रमांकाची मुंबईचा समावेश आहे. 

दरम्यान, अदानी समूह आपल्या देशातील सर्व क्षेत्रांत झपाट्याने विस्तार करत आहे. अदानी डिफेन्सने बेंगळुरूस्थित ड्रोन निर्माता जनरल एरोनॉटिक्समध्ये ५० टक्के हिस्सा खरेदी केला होता. कंपनीचा व्यवसाय वीज, सिमेंट, ड्रोन, खाद्यपदार्थ, खाण, बंदर ते विमानतळापर्यंत पसरलेला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे १०२ अब्ज डॉलर असून, जगातील श्रीमंत व्यक्तींच्या आघाडीच्या नावांच्या यादीत त्यांचा समावेश झालेला आहे. 

टॅग्स :अदानी