नवी दिल्ली: जगातील प्रमुख उद्योजकांच्या यादीतील एक बडे नाव म्हणजे गौतम अदानी. कोरोना संकटातही अदानी ग्रुपने (Gautam Adani Group) जबरदस्त कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे अवघे जग कोरोना संकटातून जात असताना, अदानी ग्रुपने आपला व्यवसाय कैक पटीने विस्तारला. यात आता नवीन मोठ्या कराराची भर पडली आहे. वीज क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बड्या कंपनीच्या एक अख्ख्या व्यवसायाचे अधिग्रहण अदानी समूह करणार असून, हा करार तब्बल १,९१३ कोटींना झाल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील तिसऱ्या सर्वांत मोठ्या अदानी समूहाने आणखी एक मोठा करार केला आहे. अदानी समूहाने मध्य भारतातील एस्सार पॉवरचा ट्रान्समिशन व्यवसाय विकत घेण्याचे मान्य केले आहे. अदानी समूहाने १९१३ कोटी रुपयांमध्ये हा करार केला आहे. या करारामुळे अदानी समूहाचे मध्य भारतात अस्तित्व मजबूत होईल, असे सांगितले जात आहे. या करारामुळे एस्सार समूह पॉवर ट्रान्समिशन व्यवसायातून बाहेर पडणार आहे. एस्सार पॉवर लिमिटेडने दोन पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पांपैकी एक अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकण्याचे मान्य केले आहे. अदानी समूहाशी केलेला हा करार एस्सार कंपनीच्या कर्ज परतफेडीच्या धोरणाचा एक भाग आहे. एस्सारने गेल्या तीन वर्षांत बँका आणि वित्तीय संस्थांना १.८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड केली आहे.
अदानी समूहाची पॉवर आणखी वाढणार
एस्सार पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे की, अदानी ट्रान्समिशन लिमिटेडसोबत त्यांच्या दोन पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पांपैकी एक विकण्यासाठी निश्चित करार करण्यात आला आहे. एस्सार पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड एस्सार पॉवरचे एक युनिट, तीन राज्यांमध्ये ४६५ किमीचे वीज पारेषण प्रकल्प आहेत. दुसरीकडे, अदानी समूहासाठी, हे संपादन विस्ताराच्या धोरणाचा एक भाग आहे. या अधिग्रहणामुळे अदानी ट्रान्समिशनचे नेटवर्क १९,४६८ सर्किट किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार आहे. यापैकी १४,९५२ सक्रिट किलोमीटर कार्यरत आहेत, तर उर्वरित ४,५१६ सक्रिट किलोमीटर विविध टप्प्यांत आहेत.
दरम्यान, गेल्या तीन वर्षात एस्सार पॉवरने आपले कर्ज ३० हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवरून ६ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज कमी केले आहे. या व्यवहारामुळे कंपनी कर्ज कमी करण्याच्या आणि अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने पॉवर सेगमेंटमध्ये पुन्हा संतुलन साधत आहे, असे एस्सार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एस्सार कंपनीकडे भारत आणि कॅनडामध्ये चार पॉवर प्लांट्स असून, त्याची उत्पादन क्षमता २ हजार ०७० मेगावॅटची आहे.