उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाची नजर आता दिवाळखोर झालेल्या जेपी समूहाच्या मालमत्तेवर आहे. जेपी समूहाचे रिअल इस्टेट आणि सिमेंट युनिट्स विकत घेण्याचा विचार सुरू आहे. या मालमत्तांसाठी अदानी समूह १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) पर्यंत बोली लावू शकतो. जेपी समूहाची मालमत्ता दिल्ली-एनसीआरमध्ये पसरली आहे, ज्यात अनेक प्रीमियम अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, व्हिला आणि गोल्फ कोर्स इत्यादींचा समावेश आहे. अदानी समूहानं ही बोली लावली तर ती देशातील सर्वात मोठ्या प्रॉपर्टीमध्येही प्रवेश करेल.
जेपी समूह सध्या देशातील सर्वात मोठ्या दिवाळखोरी कारवाई प्रकरणात अडकला आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे. जेपी समूहाची रियल्टी मालमत्ता जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) अंतर्गत येते, जी समूहाची फ्लॅगशिप कंपनी आहे. मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
सिमेंट युनिटसाठीही बोली लावणार?
जेपीच्या रिअल इस्टेट मालमत्तांव्यतिरिक्त अदानी समूह त्यांच्या सिमेंट युनिटसाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहानं या दोन्ही व्यवसायांच्या अधिग्रहणासाठी प्रस्तावित केलेल्या रिझॉल्यूशन पॅकेजमुळे बँका आणि इतर कर्जदारांना सुमारे १५,००० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
हाय प्रोफाईल प्रकल्पांचाही समावेश
जेपी ग्रुपच्या रिअल इस्टेट होल्डिंग्समध्ये ग्रेटर नोएडामधील ४५२ एकर जेपी ग्रीन्स टाऊनशिपसारख्या हाय-प्रोफाईल प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यात लक्झरी व्हिला, अपार्टमेंट आणि गोल्फ कोर्सचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीचा नोएडामध्ये जेपी ग्रीन्स विश टाऊन आणि जेपी ग्रीन्स स्पोर्ट्स सिटी नावाचा १,०६३ एकरमध्ये एक टाऊनशिप प्रकल्प आहे, ज्यात यमुना एक्स्प्रेस वेवर मोटर रेसिंग ट्रॅक आहे.
सध्या अदानी समूहाची रिअल इस्टेट प्रामुख्यानं मुंबईभोवती पसरलेली असून त्याची किंमत सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास आणि वांद्रे येथील महत्त्वाच्या भूखंडासह कंपनीचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत.