गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. या काळात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. परंतु यातच एक गुंतवणूकदार त्यांच्यासाठी संकटमोचक ठरला होता. दिग्गज गुंतवणूकदार राजीव जैन यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूकीतून मोठा नफा कमावला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, राजीव जैन जवळपास १९,९०० कोटी रुपयांच्या नफ्यात आहेत.
गेल्या वर्षी जेव्हा हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, त्याच वेळी राजीव जैन यांच्या जीक्युजी पार्टनर्स (GQG Partners) या गुंतवणूक संस्थेनं समूहाच्या ४ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अदानी समूहावर विश्वास व्यक्त करणारे ते पहिले मोठे गुंतवणूकदार होते.
रिपोर्टनुसार, राजीव जैन यांनी सुमारे १० महिन्यांपूर्वी अदानी समूहामध्ये मार्च २०२३ पर्यंत १.९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती, जी आज सुमारे १३० टक्क्यांनी वाढून ४.३ अब्ज डॉलर्स झाली आहे. अशाप्रकारे, राजीव जैन यांच्या गुंतवणुकीचे मूल्य गेल्या १० महिन्यांत २.४ बिलियन डॉलर्सनं वाढलं आहे, जे भारतीय रुपयात पाहायला गेल्यास १९,९०० कोटी रुपये आहे.
इमर्जिंग मार्केट्समध्ये गुंतवणूकीसाठी ओळख
राजीव जैन हे इमर्जिंग मार्केट्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तेव्हा त्यांनी अदानी समूहात गुंतवणूक केली होती. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर, अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप एकेकाळी १५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घसरलं होतं. अदानी समूहानं हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आलेले आरोपही सातत्यानं फेटाळले होते.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या एसआयटीद्वारे तपासाला नकार दिला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली होती. या तेजीचाही फायदा राजीव जैन यांना मिळाला आहे.