Gautam Adani Group : वादात सापडलेल्या अदानी समूहाच्या शेअर्सवर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जोरदार दबाव दिसून येत आहे. मात्र, समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्याचा चढ-उतार हा 'तात्पुरता' आहे. मंगळवारी त्यांनी एक निवेदन जारी केलं. "अदानी एंटरप्रायझेसनं गेल्या तीन दशकांमध्ये तिमाही दर तिमाही आणि वर्षानुवर्षे स्वत:ला एक यशस्वी इन्फ्रास्ट्रक्चर इनक्युबेटरच्या रुपात सिद्ध केलंय. एक कोअर इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय उभा करण्याचा एक ट्रॅक रेकॉर्डही दाखवलाय," असं त्यांनी नमूद केलं.
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्याच दिवशी गौतम अदानी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 820 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसला 11.63 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण या वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसनं मजबूत नफा नोंदवला आहे.
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची कंसोलिडेटेड मिळकत वार्षिक आधारावर वाढून 26,612 कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीशी तुलना केली असता कंपनीची मिळकत 18,758 कोटी रुपये इतकी होती. डिसेंबरच्या तिमाहीत अदानी एंटरप्रायजेसच्या नफ्याच्या टक्केवारीतही सुधार पाहायला मिळाला आहे. वार्षिक पातळीवरील नफ्याचं 4.1 टक्क्याचं प्रमाण आता 6.1 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल
"अदानी एंटरप्रायझेसची विलक्षण लवचिकता आणि अत्यंत फायदेशीर मुख्य क्षेत्रातील व्यवसाय तयार करण्याची क्षमता सूचित करते की अदानी समूहाच्या इतर कंपन्यांच्या विविध क्षमतांचा लाभ घेण्याची आमची रणनीती सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करत राहील,” असंही अदानी म्हणाले. हिंडेनबर्गनं केलेले आरोप गौतम अदानी यांनी फेटाळून लावले आहेत. अदानी एंटरप्रायझेसच्या तिमाही निकालांवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा एकदा आरोप फेटाळून लावले."आमचे यश मजबूत गव्हर्नन्स, नियमांचे काटेकोर पालन, शाश्वत कामगिरी आणि मजबूत रोख प्रवाह यामुळे आहे," असं त्यांनी नमूद केलं.
“बाजारातील सध्याची अस्थिरता तात्पुरती आहे. एक इनक्यूबेटर म्हणून, दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. अदानी एंटरप्रायझेस कर्ज कमी करणे आणि विस्तार तसंच वाढीसाठी धोरणात्मक संधी शोधणं या दुहेरी उद्दिष्टांवर यापुढेही काम करत राहिल," असं गौतम अदानी यांनी स्पष्ट केलं.