लखनऊ: जगभरातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले आशियातील दुसरे सर्वांत मोठे उद्योजक असलेल्या गौतम अदानींच्या समूहामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला मोठी लॉटरी लागली आहे. अदानी समूह उत्तर प्रदेश तब्बल ७० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. तशी घोषणा अदानी समूहाकडून करण्यात आली आहे.
'उत्तर प्रदेश इन्व्हेस्टमेंट समीट २०२२' या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात ८०,००० कोटींच्या कामांचे भूमीपूजन केले होते. या निधीतून १,४०६ प्रकल्प उभारले जाणार आहेत. कृषी, आयटी, एमएसएमई, कारखाना उत्पादन, ऊर्जा, फार्मा, संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, पर्यटन या क्षेत्रात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
अदानी ग्रुप ७० हजार कोटींची गुंतवणूक करणार
'उत्तर प्रदेश इन्व्हेस्टमेंट समीट २०२२' या परिषदेला गौतम अदानी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी अदानी समूह उत्तर प्रदेशात ७०,००० कोटींची गुंतवणूक करेल, अशी घोषणा केली. या प्रचंड गुंतवणुकीने उत्तर प्रदेशात ३०,००० नोकऱ्या तयार होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. अदानी समूह उत्तर प्रदेशात रस्ते आणि महामार्ग विकासासाठी २४,००० कोटींची गुंतवणूक करेल. त्याशिवाय मल्टीमॉडेल लॉजेस्टिक आणि संरक्षण क्षेत्रात अदानी समूह ३५,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी अदानी समूहाने गुजरातमध्ये हरित उर्जेसाठी जवळपास ३५,००० कोटींची गुंतवणूक केली होती.
दरम्यान, उत्तर प्रदेशातून एक जिल्हा एक उत्पादन या अभिनव उपक्रमाने राज्यातील निर्यात १.५६ लाख कोटींपर्यंत वाढली असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील बेरोजगारी दर १८ टक्क्यांवरुन २.९ टक्के इतका खाली आला असल्याचे त्यांनी नमूद केले.