Gautam Adani Investment : मोठ्या गुंतवणूकीची वाट पाहणाऱ्या पश्चिम बंगालला आता उद्योजक गौतम अदानी यांनी हात दिला आहे. अदानी समुहानं पश्चिम बंगालमध्ये १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केलीये. पहिल्यांदाच समुहानं इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची घोषणा केली.
निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये पुढील १० वर्षांत ही गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून २५ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे समुहदेखील मोठ्या चर्चेत आहे.
पोर्ट ते लॉजिस्टिक पार्कपर्यंत गुंतवणूकबुधवारी आयोजित सहाव्या ग्लोबल बंगाल बिझनेस समिट २०२२ मध्ये अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी गुंतवणूकीची घोषणा केली. राज्यात जागतिक दर्जाचं पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक डेटा सेंटर, अंडर सी केबल, डिजिटल इनोव्हेशनमध्ये सेंटर ऑफ एस्किलंस, वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक पार्कमध्ये गुंतवणूक केली जाणार असल्याचं गौतम अदानी यांनी बोलताना सांगितलं. गौतम अदानी पहिल्यांदाच या समिटमध्ये सहभागी झाले होते.
ताजपुर पोर्टसाठी सर्वाधिक बोलीपश्चिम बंगालमध्ये अदानी समुहाची उपस्थिती अतिशय कमी आहे. सध्या कंपनीचा केवळ एकच एडिबल ऑईल प्लांट हल्दिया येथे आहे. तो प्रकल्प अदानी विल्मर यांचा आहे. बंगालच्या ताजपुर बंदरासाठी अदानी समुहानं सर्वाधिक बोली लावली आहे. परंतु राज्य सरकारनं एल १ बिडरच्या रुपात नावाची घोषणा केलेली नाही. आपण ज्या गुंतवणूकीबद्दल सांगत आहोत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पश्चिम बंगालच्या लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरणार असल्याचंही अदानी यावेळी म्हणाले.