“ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यावर अधिक चिंता करण्याची गरज नसते. याच सिद्धांतावर आपण काम करतो,” असं वक्तव्य आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी केलं. गौतम अदानी हे अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर आले आहे. नव्वदच्या दशकात त्यांचं अपहरण धआलं होतं. याशिवाय २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ते ताज हॉटेलमध्येही अडकले होते.
इंडिया टीव्हीशी साधलेल्या संवादादरम्यान गौतम अदानी यांनी आपबिती सांगितली. “जीवनात आतापर्यंत दोन वेळा मृत्यूला जवळून पाहिलं आहे. वाईट वेळ विसरून जाणंच चांगलं आहे. मी प्रत्येक परिस्थितीत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी अपहरण झालं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला सोडण्यात आलं. ज्या रात्री माझं अपहरण झालं होतं, त्या रात्रीही मी शांततेनं झोपलो होतो. कारण ज्या गोष्टी आपल्या हाती नाही, त्यावर विचार करून काही फायदा नाही,” असं अदानी म्हणाले.
ताजमध्येही अडकलेले अदानी
ज्यावेळी २६ नोव्हेबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आपण ताज हॉटेलमध्येच होतो. दुबईवरून आलेल्या एका मित्रासोबत ते जेवणासाठी ताज हॉटेलला गेले होते. डोळ्यासमोर दहशतवादी गोळ्या चालवत होते. तो प्रकार अगदी जवळून पाहिला आहे. परंतु आपण घाबरलो नाही, कारण त्याने काही होणार नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.