Join us  

Gautam Adani: फक्त कमाईतच नव्हे, तर दानशूर व्यक्तींमध्ये 'अदानी' ठरले अव्वल; नवा विक्रम प्रस्थापित!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:55 PM

आशियातील 'चॅरिटेबल हिरोज'च्या यादीची १६ वी आवृत्ती मंगळवारी प्रसिद्ध झाली.

भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी, शिव नाडर आणि अशोक सूता तसेच मलेशियन-भारतीय उद्योगपती ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया यांचा फोर्ब्सच्या आशियातील धर्मादाय नायकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आशियातील 'चॅरिटेबल हिरोज'च्या यादीची १६ वी आवृत्ती मंगळवारी प्रसिद्ध झाली. फोर्ब्सने जारी केलेल्या निवेदनानुसार या यादीमध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशात अग्रगण्य दानधर्म करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

अदानी या वर्षी जूनमध्ये ६० वर्षांचे झाले. यानिमित्तानं त्यांनी धर्मादाय गोष्टींसाठी ६०,००० कोटी रुपये ($7.7 अब्ज) खर्च करण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे दानशूरतेच्या यादीत त्यांचा अव्वस स्थानी समावेश झाला आहे. अदानींकडून हा निधी आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासावर खर्च केला जाणार आहे. ही रक्कम अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सेवाभावी कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. अदानी फाउंडेशनची स्थापना १९९६ मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील ३७ लाख लोकांना मदत करतं.

शिव नाडर यांनी ११,६०० कोटींची देणगीशिव नाडर यांची गणना देशातील आघाडीच्या देणगीदारांमध्ये केली जाते. शिव नाडर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या वर्षी त्यांनी ११,६०० कोटी रुपये ($142 दशलक्ष) फाउंडेशनला दान केले आहेत. या फाउंडेशनची स्थापना १९९४ मध्ये झाली. नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आहेत. फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी शाळा, विद्यापीठे अशा अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत.

या लोकांनीही केलं दानतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अशोक सूता यांनी वैद्यकीय संशोधनासाठी एका ट्रस्टला ६०० कोटी ($75 दशलक्ष) देण्याचे वचन दिले आहे. २०२१ मध्ये त्यांनी या ट्रस्टची स्थापना केली. मलेशियन-भारतीय ब्रह्मल वासुदेवन, क्वालालंपूरस्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रेडॉरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया क्रेडॉर फाउंडेशनच्या माध्यमातून मलेशिया आणि भारतातील स्थानिक समुदायांना मदत करतात. ही एक एनजीओ आहे जी २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या वर्षी मे मध्ये, त्यांनी शिक्षण आणि रुग्णालय बांधण्यासाठी ५० दशलक्ष मलेशियन रिंगिट ($11 दशलक्ष) दान केले. वासुदेवन म्हणाले, या कामात आमच्यासोबत इतर लोकही पुढे येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आता या प्रकल्पासाठी संपूर्ण आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानी