Gautam Adani News : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आपल्या एका जॉइंट व्हेंचर कंपनीतील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. अदानी विल्मर (Adani Wilmar) ही अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी आहे. अदानी समूह (Adani Group) आणि सिंगापूरची फूड प्रोसेसिंग कंपनी विल्मर इंटरनॅशनल (Wilmar International यांचा यात ८८ टक्के हिस्सा आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, दोन्ही कंपन्या अदानी विल्मरमधील आपला हिस्सा विकण्यासाठी बँकांशी बोलणी करत आहेत. मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नियमांमुळे हे पाऊल उचललं जात आहे. सेबीच्या नियमांनुसार कोणत्याही कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी विल्मरमधील १३ टक्के हिस्सा विकला जाऊ शकतो. हा करार सुमारे ६७० मिलियन दशलक्ष डॉलर्सचा असू शकतो. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचं मूल्यांकन सुमारे ५ अब्ज डॉलरवर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही याबाबत चर्चा सुरू असून विक्रीतील हिस्स्याची साईज आणि वेळ दोन्ही बदलू शकते. अदानी समूह आणि विल्मर इंटरनॅशनल यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अदानी विल्मरनंही याबाबत काहीही सांगितलेलं नाही. सेबीच्या नियमांनुसार मोठ्या कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून तीन वर्षांच्या आत आपला किमान २५ टक्के हिस्सा पब्लिक करावा लागतो.
शेअरची स्थिती काय?
अदानी विल्मरची स्थापना १९९९ साली झाली होती. फॉर्च्युन ब्रँडद्वारे कंपनी स्वयंपाकाचे तेल, पीठ, बेसन आणि इतर अनेक वस्तूंचं उत्पादन करते. कंपनीचा आयपीओ फेब्रुवारी २०२२ मध्ये आला होता. त्याची इश्यू प्राइस २१८ ते २३० रुपये होती. त्याची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४२२.५५ रुपये आणि नीचांकी पातळी २८५.८५ रुपये आहे. या वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये सात टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४२,९८६.८७ कोटी रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.)