मुंबई: अदानी समूहाचे चेअरमन असलेल्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत सातत्यानं वाढ होत आहे. दिग्गज अब्जाधीश आणि गुंतवणूकदार वॉरन बफे यांना अदानींनी मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या रियल टाईम बिलेनियर लिस्टच्या यादीत अदानी पाचव्या स्थानावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सनं प्रसिद्ध केली आहे.
अदानी आणि कुटुंबाच्या श्रीमंतीत चांगलीच वाढली आहे. त्यांच्या संपत्तीचं मूल्य १२३.२ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचलं आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क आहेत. त्यांची संपत्ती २६९.७ अब्ज डॉलर आहे. त्यानंतर ऍमेझॉनचे जेफ बझोस (१७०.२ अब्ज डॉलर), एलव्हीएमएचच्या बर्नार्ड अरनॉल्ट आणि कुटुंब (१६६.८ अब्ज डॉलर), मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१३०.२ अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स चौथ्या स्थानी आहेत. तर अदानी पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या संपत्तीत ७ अब्ज डॉलर्सचा फरक आहे. त्यामुळे अदानी लवकरच गेट्स यांना मागे टाकतील अशी शक्यता आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आधी भारतातील केवळ एकच उद्योगपती असायचे. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव टॉप १० मध्ये दिसायचं. आताही अंबानी टॉप १० मध्ये कायम आहेत. ते आठव्या स्थानी आहेत. मात्र अदानींनी उद्योग विस्तार करत अंबानींना मागे टाकलं आहे.