Join us  

संरक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याच्या विचारात अदानी, तयार केली २.५ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 1:40 PM

Gautam Adani News : भारतातील दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी डिफेन्सला आपली तांत्रिक क्षमता वाढवायची आहे. गौतम अदानी समूह येत्या दोन-तीन वर्षांत संरक्षण क्षेत्रातील कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

Gautam Adani News : भारतातील दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी डिफेन्सला आपली तांत्रिक क्षमता वाढवायची आहे. आता कंपनीला अनमॅन्ड सिस्टम, स्मॉल आर्म्स, मिसाईल आणि इंडिजीनस आर्टलरी आदींच्या कामात उतरायचं आहे. गौतम अदानी समूहानं संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना विकत घेण्यासाठी २.५ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केल्याची माहिती समोर आलीये. गौतम अदानी समूह येत्या दोन-तीन वर्षांत संरक्षण क्षेत्रातील कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

ड्रोन टेक कंपन्यांवर नजर

अनेक ड्रोन टेक कंपन्या गौतम अदानी समूहाच्या अदानी डिफेन्स कंपनीच्या रडारवर आहेत. बेंगळुरूस्थित या ड्रोन कंपन्या गौतम अदानी डिफेन्सच्या नेटवर्कमध्ये सामील होऊ शकतात. इकॉनॉमिक टाईम्सनं प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली. ड्रोन टेक कंपन्यांच्या बाबतीत येत्या काही महिन्यांत मोठी डील होऊ शकते.

युएईच्या एज ग्रूपसोबत करार

अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसनं युएईस्थित एज ग्रुपसोबत कोलॅबरेशन अॅग्रीमेंट केलं होतं. संरक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीत हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार क्षेपणास्त्रं आणि शस्त्रास्त्रांवर काम केलं जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अदानी डिफेन्सनं मोठी गुंतवणूक केल्याची माहिती दिली होती. येत्या १० वर्षांत कंपनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या संरक्षण आणि एअरोस्पेस क्षमतेचा वापर करून संरक्षण उत्पादनांसाठी एक जागतिक व्यासपीठ स्थापित करणे हे या कराराचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून त्यांचे संबंधित उत्पादन पोर्टफोलिओ एकत्र येतील आणि जागतिक, तसंच स्थानिक पातळीवर सेवा पुरवता येईल.

कानपूरमध्ये ५०० एकरचं अॅम्युनिएशन पार्क

फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं कानपूरमध्ये ३,००० कोटी रुपयांचं युनिट लॉन्च केलं होतं. हे ५०० एकरमध्ये पसरलेले आहे. या सुविधेमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या क्षमतेची युद्धसामग्री तयार केली जाणार आहे, ज्याचा सुरक्षा दलांकडून वापर केला जातो. हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल असणार असल्याचं बोललं जात आहे. अदानी समूह, संरक्षण क्षेत्रात वापरली जाणारी डिफेन्स काऊंटर ड्रोन सिस्टीम बनवण्याच्याही तयारीत आहे. गौतम अदानी समूह आता प्रगत तंत्रज्ञानाच्या शोधात आहे आणि अधिग्रहणाच्या माध्यमातून आपली क्षमता वाढवू इच्छित असल्याची माहिती समोर आलीये.

टॅग्स :गौतम अदानीअदानी